
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या बेळगाव दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
बेळगाव : पक्षाच्या विविध कार्यक्रम आणि बैठकीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (ता. 16) व रविवारी (ता. 17) राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांचे सांबरा विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते विशेष हेलिकॉप्टरव्दारे बागलकोटला जाणार असून मंत्री मुरगेश निराणी यांच्या साखर कारखान्यातील विशेष विभागाचे उद्घाटन करतील. तेथून दुपारी 1-15 वाजता बेळगावला परतणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री शहा हे दुपारी 2.50 पर्यंत येथील सरकारी विश्रामगृहात विश्रांती घेतील. दुपारी 3 ते 4 यावेळेत केएलई रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी जेएनएमसीमधील अत्याधुनिक प्रयोगशाळेचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. दुपारी 4.10 वाजता जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या पक्षाच्या जनसेवक मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते भाजप पुरस्कृत ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार होणार आहे.
हेही वाचा - काढायला गेला कर्ज अन् मिळाली मदत
या मेळाव्यानंतर ते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 ते 7.20 पर्यंत शहरातील संकम हॉटेल येथे होणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तेथून रात्री 7.30 वाजता सांबरा विमानतळावरुन विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होतील.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या बेळगाव दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी या सभेची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. या जनसेवक मेळाव्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, गृहमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी यांच्यासह अन्य मंत्री, जिल्ह्यातील पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी भाजपचे राज्याध्यक्ष खासदार नलिनकुमार कटील यांनी गुरुवारी (ता. 14) जिल्हा क्रीडांगणाला भेट दिली.
हेही वाचा - बिबट्याचा वावर कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राच्या हद्दीत जास्त ; यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत
संपादन - स्नेहल कदम