esakal | ...अन्‌ त्यांना जावे लागले मुंबईला परत; पण झाले काय?
sakal

बोलून बातमी शोधा

... And they had to go back to Mumbai; But what happened?

शाहूवाडी तालुक्‍यातील तब्बल 103 नागरिक दोन ट्रॅव्हल्स, रिक्षा, आदी वाहने करून मुंबईहून शासकीय पास घेऊन निघाले. ते कोकरूड मार्गे शाहूवाडीला जाणार होते. कोकरूड-नेर्ले पुलावर मंगळवारी सकाळी आले व तेथील चेकपोस्ट वरती आडकले. 

...अन्‌ त्यांना जावे लागले मुंबईला परत; पण झाले काय?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोकरूड : दोन महिन्यांपासून कोरोना या महाभयानक विषाणूमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनला वैतागलेल्या मुबाईकरांना घरी जाण्याची ओढ लागली. या ओढीने शाहूवाडी तालुक्‍यातील तब्बल 103 नागरिक दोन ट्रॅव्हल्स, रिक्षा, आदी वाहने करून मुंबईहून शासकीय पास घेऊन निघाले. ते कोकरूड मार्गे शाहूवाडीला जाणार होते. कोकरूड-नेर्ले पुलावर मंगळवारी सकाळी आले व तेथील चेकपोस्ट वरती अडकले. 

सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या कोकरूड-नेर्ले पुलावरती असणाऱ्या चेकपोस्ट वरती पोलिसांकडून त्यांची चौकशी झाली, त्यातील 93 जणांचे पास बोगस निघाले व त्यांना परत मुंबईचा रस्ता धरावा लागला. गावाला येण्याच्या ओढीने या नागरिकांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी मुंबई येथील एजंटाकरवी प्रत्येकी 2500 रुपये देऊन पास हे घेतले.

यामध्ये एक वर्षापर्यंतची 10 मुले होती. मात्र 103 पास पैकी केवळ 10 पास स्कॅन झाले. ज्यांचे पास स्कॅन झाले त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश मिळाला, इतर 93 नागरिकांचे पास स्कॅन न झाल्याने ते बोगस असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर रखरखत्या उन्हात थांबून देखील त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. गावाच्या अगदी जवळ येऊन त्यांना परत मुंबईला जावे लागले. 

कोकरूड पोलिसांनी जपली माणुसकी 
हा सर्व प्रकार सुमारे पाच ते सहा तास चालू होता. यामध्ये या नागरिकांच्या प्रवेशासाठी शाहूवाडी तालुक्‍यातील नेते मंडळींकडून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, शाहूवाडीचे तहसीलदार, लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळीशी संपर्क साधण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना विनवणी करण्यात आली, मात्र त्यांनी या नागरिकांना प्रवेश नकारला. दिवसभर उपाशीपोटी असलेल्या या नागरिकांना कोकरूड पोलिसांनी अल्पोपहार देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.