हिंगणघाट घटनेमुळे अण्णा संतापले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

राळेगणसिद्धी : "हिंगणघाट येथील घटना राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. या घटना छत्रपती शिवरायांच्या राज्यात घडणे, हा मानवतेला लागलेला कलंक आहे,' अशी लेखी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

राळेगणसिद्धी : "हिंगणघाट येथील घटना राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. या घटना छत्रपती शिवरायांच्या राज्यात घडणे, हा मानवतेला लागलेला कलंक आहे,' अशी लेखी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

कठोर कायदे नसल्यामुळेच... 
हजारे यांनी तीत म्हटले आहे, की कोपर्डी, लोणी मावळा येथील निर्भयांवर अत्याचार झाला. नराधमांना फाशीची शिक्षाही सुनावली, तरी शिक्षेची अंमलबजावणी केली जात नाही. त्याला पूर्वीचे व आताचेही सत्ताधारीच जबाबदार आहेत. लोकसभा, विधानसभेत कायदे होतात. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सर्वांनी मिळून कायदा करणे आवश्‍यक होते; पण तसे कठोर कायदे न झाल्यामुळे नराधमांना असे कृत्य करण्याची भीती वाटत नाही. त्यामुळे निष्पाप निर्भयांवर अन्याय, अत्याचार होतो. त्यांचा बळी जातो.

हेही वाचा - इंदोरीकरांमागे पोलिसांचे झेंगाट

 म्हणायला फास्ट ट्रॅक, काम कासवगती
अत्याचाराची नोंद होण्यास उशीर होतो. गुन्हा नोंदविला तर पंचनाम्यात नराधमांना पळवाटा राहून जातात. चौकशी वेगाने होत नाही. "फास्ट ट्रॅक कोर्ट' म्हणतात; पण सुनावणीचे कामकाज संथ गतीने चालते. दिल्लीतील निर्भया अत्याचारातील नराधमांना सात वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावली; पण अजूनही शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.

लोणी मावळा प्रकरणात पाच वर्षे झाली, अजून गुन्हेगारांना फाशी झाली नाही. 2012मध्ये ज्युडिशिअल अकाउंटॅबिलिटी बिल संसदेत आल्यापासून वेळोवेळी सरकारशी पत्रव्यवहार केला. हा कायदा झाला असता, तर आज न्यायव्यवस्थेत विलंब झाला नसता, असे हजारे यांनी म्हटले आहे. 

हाच महिलांचा सन्मान का? 
हजारे यांनी म्हटले आहे, की फक्त "बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशा घोषणा देऊन काय होणार? देशभर लाखो रुपये खर्चून मोठमोठे बोर्ड लावले. त्यावर महिलेसमोर गॅस सिलिंडर ठेवून लिहिले, की "महिलाओं को सन्मान मिला'. हजारो निर्भयांवर अन्याय, अत्याचार होऊन त्यांची हत्या झाली. हाच महिलांचा सन्मान आहे का?  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hajare is Angry by the Hinganghat incident