अण्णा का म्हणतात, मला नको झेड सुरक्षा

एकनाथ भालेकर
गुरुवार, 26 मार्च 2020

मी माझे सर्व दौरे रद्द केले असून या काळात राळेगणसिद्धी येथील निवासस्थानी राहणार आहे. त्यामुळे माझी पोलिस सुरक्षा व्यवस्था कमी करून ती सर्व यंत्रणा इतरत्र उपयोगात आणावी, अशी विनंती हजारे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

राळेगणसिद्धी : कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी संचारबंदी काळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याने माझी सुरक्षा व्यवस्था कमी करावी, अशी लेखी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. 

नाशिक येथील व्हीआयपी सुरक्षा विभागाने हजारे यांच्या मागणीनुसार त्यांच्या यंत्रणेतील काही कर्मचारी कमी केल्याचे आज पाहायला मिळाले. सध्या नाशिक येथील एक अधिकारी व दोन कर्मचारी हजारे यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. 

नगरचे प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनाही हजारे यांनी याबाबत पत्र पाठविले आहे. कोरोनाचे देशावर आलेले संकट हे अतिशय गंभीर आहे. केंद्र व राज्य सरकारने प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणून देशात संचारबंदी लागू केल्याने या काळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.

मी माझे सर्व दौरे रद्द केले असून या काळात राळेगणसिद्धी येथील निवासस्थानी राहणार आहे. त्यामुळे माझी पोलिस सुरक्षा व्यवस्था कमी करून ती सर्व यंत्रणा इतरत्र उपयोगात आणावी, अशी विनंती हजारे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

सध्या हजारे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. हजारे यांनी याआधीही अनेकदा राज्य शासनाला सुरक्षा कमी करण्याची विनंती केली होती. परंतु सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली नव्हती. 

हजारे यांचा दिनक्रम 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रोज पहाटे पाच वाजता उठतात. योगासने, प्राणायाम, चालणे असा व्यायाम करतात. साडेनऊ वाजता नाष्टा करतात. त्यानंतर नियमित वाचन व लेखन करतात. सध्या वर्तमानपत्रे प्रकाशित होत नसल्याने टीव्हीवर बातम्या पाहून परिस्थितीवर लक्ष ठेवतात. त्यांचा सध्या मुक्काम राळेगणसिद्धी येथील ट्रेनिंग सेंटरमधील खोलीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna says I don't want Z security