esakal | शेतकरी हितविरोधी बांडगुळे आंदोलनात : सदाभाऊ खोत
sakal

बोलून बातमी शोधा

anti-farmer people entered in Delhi agitation: Sadabhau Khot

कृषी विधेयकाविरोधातील दिल्लीतील आंदोलनात घुसलेले विरोधी पक्ष बांडगुळासारखे आहेत. ते स्वतःच्या कष्टावर जगत नाहीत.

शेतकरी हितविरोधी बांडगुळे आंदोलनात : सदाभाऊ खोत

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : कृषी विधेयकाविरोधातील दिल्लीतील आंदोलनात घुसलेले विरोधी पक्ष बांडगुळासारखे आहेत. ते स्वतःच्या कष्टावर जगत नाहीत. त्यांना शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, असे वाटत नाही. शेतकरी गरिबीत राहिला तरच त्याच्यावर राज्य करता येईल, ही त्यांची धारणा आहे. त्याविरोधात जागृतीसाठी रयत क्रांती संघटना आणि भारतीय किसान मोर्चातर्फे गुरुवार (ता. 24) पासून किसान आत्मनिर्भर यात्रा करत आहोत, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,""स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळते आहे. शरद जोशींच्या विचाराने चालणाऱ्यांनी त्याचे स्वागत केले. त्याच्या विरोधातील लोक शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करताहेत. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. या विधेयकात शेतकरी विरोधी आहे तरी काय? बाजार समितीची मक्केदारी मोडली जाणार आहे,

शेतकरी कुठेही आपला माल विकू शकणार आहे. त्यात सेस, हमाली, तोलाई, वाहतूक अशी लूट नसेल. अडते, व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघेल. एक देश एक बाजारपेठ होईल. शेतीत गुंतवणूक वाढेल. फार्मिंग कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात, हा आरोपच चुकीचा आहे. कारण, यात शेतीशी नव्हे तर शेतमालाशी करार व्हायचा आहे. त्यानिमित्ताने या कंपन्या चांगले बियाणे, खते, अवजारे यात गुंतवणूक करतील. शेतकऱ्यांच्या बांधावरून माल खरेदी करतील.

फसवणूक झाली तर लवादाकडे तक्रार करा, कंपनीला दंड होईल. महाराष्ट्रात हा कायदा 2006 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लागू केला होता. त्यांचाच पक्ष त्याला विरोध करतोय.'' 

ते म्हणाले,""अदानी, अंबानी यांच्या नावे भुताची भीती घालू नका. शेतकऱ्याचा एक गुंठाही या उद्योजकांचा होणार नाही. हमीभावाने खरेदी सुरूच राहील आणि शेतकऱ्यांचे हितच साधले जाईल. हे सारे आम्ही शेतकऱ्यांना सांगण्यासाठी यात्रा करणार आहोत. तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणचा दौराही करणार आहोत.'' आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, दीपक माने, अशरफ वांकर आदी उपस्थित होते. 

अशी असेल यात्रा 
24 डिसेंबरला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावी येचेमच्छिंद्र येथे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता उद्‌घाटन. तेथून वाळवा, मिरज, शिरोळ तालुक्‍यातील गावांचा प्रवास करत इचलकरंजीत सायंकाळी 7 वाजता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सभा होईल. 25 व 26 ला पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा तालुक्‍यात दौऱ्यानंतर 27 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ होईल. 

संपादन : युवराज यादव