आता मीटर टाकावाच लागणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सातारा - नव्या दरप्रणालीनुसार मीटरमध्ये दुरुस्ती करण्याची रिक्षाचालकांना दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे येत्या पाच तारखेपासून मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे मीटरनुसार भाडे आकारणीस नकार देणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. 

सातारा - नव्या दरप्रणालीनुसार मीटरमध्ये दुरुस्ती करण्याची रिक्षाचालकांना दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे येत्या पाच तारखेपासून मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे मीटरनुसार भाडे आकारणीस नकार देणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. 

इंधनाचे वाढते दर, विम्याच्या दरात झालेली वाढ, गाडीचा मेंटेनन्स या सर्वांमुळे रिक्षा व्यावसायिकांना मीटरनुसार भाडे आकारणी करणे शक्‍य नसल्याची रिक्षाचालकांची ओरड होती. त्यांची ही मागणी जिल्हा रिक्षा, जीप, टॅक्‍सी संघटनेच्या माध्यमातून दीपक पवार यांनी वारंवार लावून धरली होती. मात्र, भाडे निश्‍चितीचे सूत्र ठरले नसल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून भाडेवाढ केली जात नव्हती. सततच्या पाठपुराव्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दीड महिन्यापूर्वी रिक्षा भाड्याची पुनर्निश्‍चिती केली. त्यात रिक्षाचालकांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी असलेला पहिला टप्पा एक किलोमीटरचा करण्याचे तसेच त्याला 20 रुपये भाडे आकारण्याची मागणी पूर्ण झाली. या निर्णयामुळे रिक्षाचालकांना चांगले भाडे मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी मीटरनुसार भाडे आकारणी करावी, अशी सूचना श्री. धायगुडे यांनी रिक्षा संघटनांना केली होती. 

नव्या नियमानुसार भाडे आकारणीसाठी रिक्षाचालकांना मीटरमध्ये सेटिंग करून घेणे आवश्‍यक होते. त्याला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी 45 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत येत्या पाच सप्टेंबरला संपत आहे. या कालाधीत बहुतांश रिक्षाचालकांनी मीटरमध्ये आवश्‍यक ते बदल करून घेतले आहेत. उरलेल्यांनी तातडीने मीटरमध्ये बदल करून तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत मीटरप्रमाणे भाड्याची आकारणी व्हावी, याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी मीटरचा वापर करावा, असे आवाहन श्री. धायगुडे यांनी केले आहे. प्रशासनाबरोबरच रिक्षा संघटनांनीही मीटरनुसारच भाडे आकारणी करावी, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केले आहे. 

नागरिकांनी तक्रार करावी - संजय धायगुडे 
रिक्षाचालकांना त्यांच्या मागणीनुसार भाडेवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी मीटरनुसारच भाडे आकारले पाहिजे. जे रिक्षाचालक त्याला नकार देतील, त्यांच्याबाबत नागरिकांनी तक्रार करावी. निनावी तक्रार आली तरीही कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे. 

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा - पवार 
प्रशासनाने रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार भाडेवाढ दिली आहे. त्यातून चांगले भाडे मिळणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी मीटरनुसारच भाडे घ्यावे. नागरिकांची अडवणूक करू नये. मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रशासनाने कारवाई करावी. संघटना त्यांच्या पाठीशी राहील, असे दीपक पवार यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to file complaint against rickshaw drivers who refuse to levy rent