
महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्न तज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक
बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्ना संदर्भात महाराष्ट्र सरकारने तज्ञ समितीची नेमणूक केली होती. या कमिटीच्या अध्यक्षपदी गेली अनेक वर्षे प्रा.एन डी पाटील होते. मात्र प्रा. एन डी पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे त्यांच्या जागी मंत्री जयंत पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कडे केली होती.
तसेच ११ मे रोजी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या पवार यांच्याशी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. यावेळी पवार यांनी लवकरच जयंत पाटील यांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच समितीच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जयंत पाटील यांची तज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
तज्ञ कमिटी सिमाप्रश्नासाठी आवश्यक असलेले निर्णय घेते तसेच महाराष्ट्र सरकार आणि मध्यवर्ती समिती यांच्यामधील दुवा म्हणुन कार्य करते. त्यामुळे कमिटीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक झाल्याचा मध्यवर्ती समितीला लाभ होणार असून समितीकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्या पूर्ण होण्यासह त्याचा पाठपुरावा करण्यास मदत मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
तज्ञ कमिटीमध्ये जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ वकील राम आपटे, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर यांच्यासह महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तज्ञ कमिटीने पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वेग याव्या यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
प्रा. एन डी पाटील यांच्या यानंतर रिक्त झालेल्या जागेवर जयंत पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने समितीची मागणी मान्य केली आहे. त्याबद्दल समाधानी असून येणाऱ्या काळात जयंत पाटील सीमाप्रश्नी महत्त्वपूर्ण निर्णय घेतील अशी आशा आहे.
दीपक दळवी, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती
Web Title: Appointment Of Jayant Patil As Chairman Of Maharashtra Karnataka Boundary Expert Committee Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..