आरगचा आठवडा बाजार आठ महिन्यानंतर भरला 

निरंजन सुतार
Friday, 6 November 2020

तब्बल आठ महिन्यांनी आरगचा आठवडी बाजार आज पहिल्यांदा नियमित सायंकाळी भरला. 

आरग (जि. सांगली) : येथील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला जिल्ह्यात प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारपेठेत शेतीमालासह कपड्यांचा बाजार भाजीपाल्यासह बाजारपेठेतील मुख्य दुकानातून खरेदी-विक्रीतून कोटीची उलाढाल होते. मागील काही महिन्यात आठवडी बाजार दर गुरुवारी मोजक्‍याच लोकांच्या उपस्थित सकाळी भरत असे. मात्र तब्बल आठ महिन्यांनी आरगचा आठवडी बाजार आज पहिल्यांदा नियमित सायंकाळी भरला. 

शेतकऱ्यांसह छोट्या व्यवसायका मधून आणि ग्राहकांमधून समाधान दिसत आहे. पूर्व भागातील आरग येथे दर गुरुवारी सायंकाळी आठवडी बाजार भरगच्च भरत असतो. बाजारामध्ये स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळत असल्याने आरग परिसरातील दहा ते पंधरा खेड्यांमधून गावांमधून तसेच कर्नाटक राज्यांमधून नागरिक इथे खरेदी-विक्रीसाठी येतात.

शिवाय शेतकरी देखील मोठ्या संख्येने भाजीपाला विकण्यासाठी या ठिकाणी येतात. भाजीपाला बरोबरच खाद्यपदार्थ , किराणा मालाचे साहित्य , अन्नधान्य , कपडे , विविध शेती उपयोगी साहित्य या ठिकाणी खरेदी विक्री होत असते. अगदी सुईपासून ते चार चाकी वाहन पर्यंत चे सर्व साहित्य येथील बाजारात मिळते. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जाणवत असला तरी ग्राहकांनी व्यापाऱ्यांनी बाजारात जाताना मास्कचा वापर करावा आणि काळजी घ्यावी. घरी गेल्यानंतर ही स्वच्छता बाळगावी असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय आरग यांच्यामार्फत करण्यात आले आहे. 

ग्राहकांची संख्या वाढत आहे

लॉकडाऊन परिस्थिती आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. सध्या बाजाराला सुरुवात झाल्यामुळे समाधान आहे. शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची संख्या देखील बाजारात वाढत आहे. 
- शिवराज पाटील, शेतकरी, आरग. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arag’s weekly market opened after eight months