बाळ का चिडत असेल?

अर्चना मुळे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

काय झालं? का रडतो हा? मी घेऊ का त्याला? असं मी विचारताच सीमाने माझ्याकडे फक्त संशयानेच नाही तर रागाने नजर टाकली. फणफणत बाजूला गेली. तिच्या कडेवर एक वर्षाचा नातू साहील होता. त्याला क्षणभरही नजरेआड न करणाऱ्या सीमाचा स्वभाव माहीत होता. काही दिवसांपूर्वी सीमाची सून अक्षरा माझ्याकडे आली होती. आजकाल साहील सतत रडत असतो. चिडचिड करतो. केस ओढणे, ओचकारणे चालूच असतं, खाण्यापिण्‍याच्‍या तक्रारी आहेतच, असं सांगत होती. 

साहीलच्या जन्मापासूनचा घटनाक्रम पाहिल्यावर लक्षात आलं की पहिलंच नातवंड म्हणून सीमा त्याचे प्रचंड लाड करते. खाली पडलेलं काहीतरी उचलून तोंडात घालेल. पडेल, खेळताना हात घाण होतील, इन्फेक्‍शन होईल... वगैरे. सीमाच्या अशा वागण्याने अक्षरा हैरान. साहीलची रडारड. खेळणं त्याला माहीतच नाही.

सीमाच्या तरुणपणी शेजारचे बाळ खेळत बाहेर गेले आणि अपघात झाला. त्याला कायमचं अपंगत्व आलं. या घटनेची भीती तिच्या मनात. सीमा स्वत:च्या मुलाची देखील थोडी जास्तच काळजी करते. नातवाच्या बाबतीत अवास्तवच. याची जाणीव अक्षराला नव्हती. तिचा प्रश्न एकच होता ‘एक वर्षाचा साहील इतकं का चिडतो?’ 

मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर मोठ्यांचीदेखील चिडचिड होते. साहील लहान असला तरी त्याला भावना आहेतच. खेळायचं, अंगणभर फिरायचं, पळापळच... त्याला काहीच करता येत नव्हतं. सकाळी बाबाच्या गाडीवरुनचा एक फेरफेटका सोडला तर तो आजीच्या सुरक्षा कवचातून बाहेर नव्हता. अतिसुरक्षेचा विळखा त्याला घायाळ करत होता. आजीला हे सांगणं अक्षराला जमणारं नव्हतं. ‘नातवाला माझ्यापासून लांब करतेय’, असा गैरसमज व्हायचा...

अक्षराने काय करावे. सीमाला न दुखावता समस्या कशी हाताळावी? सीमा माझ्याकडे  येणं अशक्‍यच होतं. आम्ही मध्यम मार्ग काढला. मीच सीमाच्या घरी गेले. बोलता बोलता तिचं निरीक्षण केलं. माझ्याकडे मोबाईलवर बाळांना खेळायला न दिल्याने ती कशी कमकुवत होतात. मानसिकरीत्या कशी खचतात. त्यांना आजारपणं कशी चिकटतात, अशा क्‍लिप्स होत्या. त्या दाखवल्या. तिला जाणीव करून दिली की बाळाला काहीतरी होईल या भीतीपोटी अतिसुरक्षा दिल्याने बाळाचं आरोग्य जास्ती धोक्‍यात येऊ शकतं.

सुरवातीला सीमा काहीही ऐकून न घेण्याच्या पावित्र्यात होती, हळूहळू तिला माझं पटायला लागलं. साहीलला खेळायला दिलं पाहिजे, हे तिला लक्षात आलं. त्याचा आत्मविश्वास कमी होईल. तो भित्रा, पळपुटा होईल, अशा परिणामांची जाणीव करून दिल्यानंतर सीमाची विचारचक्र जोरात सुरू झाली. काही वेळाने सीमाला सगळ्या गोष्टी पटल्या. 

साहीलला हळूहळू  खेळायला देत जाईन. त्याला मोकळी सोडेन असं सांगितलं आणि अक्षराने मोकळा श्वास सोडला. भूतकाळातील  घटनांचा परिणाम नंतरच्या काळात वर्तनावर होऊ न देता मनातील भीती, काळजी, चिंता यावर मात करता आली पाहिजे. भूतकाळ विसरून वर्तमानात जगणे शहाणपणाचे असते. नाहीतर आपलं वर्तमान आणि  भविष्य दोन्ही बिघडणार यात शंका नाही.

अर्चना मुळे, समुपदेशक, सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Archana mule article about child

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: