अरेच्चा....एमबीएच्या प्राध्यापकांना जमेना गुणांची बेरीज 

तात्या लांडगे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

- गुणांची बेरीज 38 अन्‌ दिले 48 गुण 
- सुटा संघटनेसह विविध संघटनांकडून गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी 
- प्रश्‍नपत्रिका 70 गुणांची अन्‌ गुण मिळाले 77 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मे 2019 मध्ये घेतलेल्या एमबीएच्या द्वितीय सत्र परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीत एकूण गुणांची बेरीज 38 होत असतानाही संबंधित प्राध्यापकांनी त्या विद्यार्थ्याला 48 गुण दिले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 60 झाली असूनही त्याला 50 गुण दिले आहेत. एका विद्यार्थ्याला 70 पैकी 77 गुण दिल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, परीक्षा विभागातील अशा गैरप्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सुटा संघटनेने केली आहे. 

 

हेही आवर्जुन वाचाच....अबब...729 पदांसाठी तब्बल सव्वातीन लाख उमेदवार 

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या पुढाकारातून विद्यापीठात विविध नवे अभ्यासक्रम सुरू झाले. मात्र, काही विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापकांची कमतरता असल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडे उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी दिली जात असल्याचेही चित्र आहे. तत्पूर्वी, पैसे देऊन पास करण्याचे प्रकार विद्यापीठात झाल्याचेही समोर आले असून त्यामध्ये विद्यापीठातील काही बड्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचीही चर्चा आहे. मागील प्रकारांची चौकशी सुरू असतानाच आता एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ समोर आल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येते. दरम्यान, परीक्षा विभागातील गैरप्रकारांची चौकशी होईपर्यंत परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे यांना कार्यमुक्‍त करू नये, अशी मागणी सुटा संघटनेने कुलगुरूंकडे केली. त्यानंतर गैरप्रकारांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नियुक्‍त केली जाईल, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

चर्चेतील गैरप्रकार... 
- अभियांत्रिकीत शिकणाऱ्या स्वत:च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्याचे उपकुलसचिवांनीच वाढविले गुण 
- पेपर रिपिटर विद्यार्थ्यांचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका मिळाली नियमित विद्यार्थ्यांचीच 
- एका पेपरला 20 ते 25 हजार रुपये घेऊन वाढविले अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण 
- पेपर संपल्यानंतर एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिकाच परीक्षकांना सापडली नाही 
- एमएबीए असो की अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीत बेरीज चुकली अन्‌ वाढीव गुण दिले 
- काही महाविद्यालयांतील ठराविक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दोन-तीन प्राध्यापकांकडेच तपासणीला 

 

हेही आवर्जुन वाचाच....कर्जमाफी राहणार ऑफलाईनच ! 

स्वतंत्र समितीद्वारे होईल सखोल चौकशी 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाने उत्तरपत्रिका तपासणीत घोळ झाल्याचा आरोप विविध संघटनांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांनीही गैरप्रकाराबाबत तक्रार केल्यास कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र समिती नियुक्‍त करून त्याची सखोल चौकशी केली जाईल. त्यानुसार दोषी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arecha .... the sum of the time points for MBA professors

फोटो गॅलरी