अबब...729 पदांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

तात्या लांडगे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधन पर्यवेक्षक व परिचरची भरती
- डिसेंबरमध्ये पशुसंवर्धन विभागाची होणार ऑनलाइन परीक्षा
- उच्चशिक्षित तरुणांनी केले परिचर पदांसाठी अर्ज
- मेगा भरतीच्या पहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची होणार भरती

सोलापूर : राज्य सरकारच्या 72 हजारांच्या शासकीय रिक्‍त पदांच्या मेगा भरतीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधन पर्यवेक्षक व परिचर अशा 729 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. त्यासाठी तब्बल तीन लाख 29 हजार 689 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती महापरीक्षा सेलने दिली.

'या' घटनेमुळे तरुणाईत संताप

 

अर्जदारांची संख्या मोठी असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याचे नियोजन महापरीक्षा कक्षाचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाने 149 पशुधन पर्यवेक्षक व 580 परिचर पदांची भरती प्रक्रिया राबविली. त्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागातून तब्बल तीन लाख 30 हजार उमेदवारांनी अर्ज केले. तत्पूर्वी, शिक्षण, आरोग्य, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र, पशुसंवर्धन, पोलिस, महसूल, नगरपालिकांसह अन्य शासकीय विभागांमधील 72 हजार रिक्‍त पदांच्या भरतीचे नियोजन महापरीक्षा सेलच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मेगा भरतीच्या पहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची भरती केली जाणार असून त्याची सुरवात डिसेंबर महिन्यापासून केली जाणार आहे. स्टेट बोर्ड आणि पशुसंवर्धन विभागाची परीक्षा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर जलसंधारण, पोलिस, महसूल विभागातील रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरअखेरीस सुरु केली जाईल, असेही महापरीक्षा सेलकडून सांगण्यात आले.
-
विभागनिहाय जागा
विभाग     पद भरती
पुणे          143
मुंबई          67
नाशिक      93
औरंगाबाद  87
लातूर        22
अमरावती  69
नागपूर     99
एकूण      580

 

अपक्ष संजय शिंदेंचा अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा

पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागातून सर्वाधिक अर्ज
पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचरच्या 729 जागांसाठी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागातून सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे विभागातून सुमारे 70 हजार तर नाशिक व औरंगाबाद विभागातून दिडलाख उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. लातूर, अमरावती, नागपूर, मुंबई विभागातून सुमारे एक लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्जदारांमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा मोठा समावेश आहे. मागील आठ महिन्यांपासून परीक्षा झाली नाही मात्र, आता डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून परीक्षा केंद्र निश्‍चितीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abb ... All the million candidates for 729 posts