सांगलीच्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत अर्जेंटिनाचा लुकास लिआस्कोविच विजेता

घनश्‍याम नवाथे
Thursday, 10 September 2020

सांगली-  नूतन बुध्दिबळ मंडळाचे संस्थापक, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कारप्राप्त भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लुकास लिआस्कोविच याने 72 गुणासह विजेतेपद पटकावले. 

सांगली-  नूतन बुध्दिबळ मंडळाचे संस्थापक, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कारप्राप्त भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लुकास लिआस्कोविच याने 72 गुणासह विजेतेपद पटकावले. 

नूतन बुध्दिबळ मंडळ व पुरोहित चेस ऍकॅडमीचे श्रेयस पुरोहित यांच्यावतीने आयोजित स्पर्धेत भारतासह अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, इराण, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यासह अनेक देशातील 1690 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये 9 ग्रॅण्डमास्टर, 9 आंतरराष्ट्रीयमास्टर, 3 फिडेमास्टर आणि 2 कॅडेडमास्टर यांचा समावेश होता. 

स्पर्धेत अर्जेटिनाचा लुकास आणि उझबेकिस्तानचा जवोहिर सिंड्रो यांच्यात राजाच्या प्यादयाने सुरवात झाली. लुकासने रचलेल्या चालीना जवोहिरने जशास तसे प्रत्युत्तर दिले. विजेतेपदाच्या दिशेने आगेकूच केलेल्या लुकासने 13 व्या चालीला डाव बरोबरीत सोडवून 72 गुणासह रोख पारितोषिक व विजेतेपद पटकाविले. जवोहिरने 58 गुणासह नववे स्थान पटकावले. जॉर्जियाचा टोर्निक सॅनिकिड्‌जने भारताच्या कौस्तुव कुंडू याचा 36 व्या चालीला पराभव करून 71 गुणासह उपविजेतेपद पटकाविले. कौस्तुवला 58 गुणासह आठव्या स्थानावर जावे लागले. इराणचा मसूद मोसेडेकपूर याने रशियाच्या मॅग्झिम लुगोवोस्कोय चा 58 व्या चालीला पराभव करून 69 गुणासह तिसरे स्थान पटकाविले. मॅग्झिमला दहाव्या स्थानावर जावे लागले. 

युक्रेनचा विजूम तीवीहोडा व अमोर्नियाचा रसुलोव्ह वूगार यांनी 34 व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला. विजूमने 69 गुणासह चौथे आणि रसुलोव्हने सहावे स्थान पटकाविले. इराणचा हुमायून तोफिगी व जॉर्जियाचा निकोलोज पेट्रोअश्विली यांनी 18 व्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. हुमायूनने पाचवे आणि निकालोजने सातवे स्थान पटकाविले. सांगली जिल्ह्यातील जीत सारडा, नंदन बजाज, रुद्र जाधव, केशव सारडा, सौमिल सारडा, श्रीधर वेल्हाळ यांनी विविध वयोगटांत पारितोषिके मिळवली. फिडे पंच शार्दुल तपासे, जुईली कुलकर्णी, दिपक वायचळ यांनी काम पाहिले. चिंतामणी लिमये, प्राचार्य रमेश चराटे, चिदंबर कोटीभास्कर, डॉ. उल्हास माळी, सौ. स्मिता केळकर यांच्याहस्ते ऑनलाईन पारितोषिक वितरण झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argentina's Lukas Liaskovic wins Sangli's online chess tournament