वेळीच त्या तिघांना पोलिसांनी पकडले अन् टळला धोका.....

सकाळ वृत्तसेवा  
गुरुवार, 21 मे 2020

हातावर क्वारन्टाईनचा शिक्का असलेल्या महाराष्ट्रतील तिघांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले

(बेळगाव): हातावर क्वारन्टाईनचा शिक्का असलेल्या महाराष्ट्रतील तिघांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले व आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले. बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानकावर हा प्रकार घडला आहे. बस्थानकावर तैनात एका पोलिसाच्या दक्षतेमुळे ते तिघे सापडले. त्यापैकी एकाला तीव्र ताप असल्याचे तपासणीत आढळून आले. त्या तिघांनाही बेळगाव खानापूर तालुक्याच्या हद्दीवरील बडस गावी जायचे होते त्यासाठी बसच्या शोधात ते स्थानकावर गेले होते हे चौकशीत स्पष्ट झाले.

उपलब्ध माहितीनुसार त्यातील एकजण विटा तर दुसरा पुणे येथून आला होता. तिसरा महाराष्ट्रातून आला होता पण त्याचे गाव समजू शकले नाही. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तेथे त्यांची पुन्हा आरोग्य तपासणी होईल, गरज भासल्यास त्यांच्या घशातील द्राव्य घेऊन तपासणीसाठी पाठविले जाईल. त्यांचे संस्थत्मक विलगिकरण केले जाईल. मार्केट पोलीस ठाण्याचे  पोलिस कॉन्स्टेबल एच बी मडीवाळर हे गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकावर तैनात होते. त्यावेळी त्यांना क्वारन्टाईन शिक्का असलेले तिघे आढळले.

हेही वाचा- सीमाभागातील विद्यार्थ्यांत संभ्रम  : एक डोळा स्क्रीनवर तर दुसरा निर्णयाकडे!

त्यातील एकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांनी लागलीच मार्केटचे निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने आरोग्य विभागाला माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावली व त्यांना आरोग्य विभागाच्या हवाली केले. या प्रकारामुळे बसस्थानकावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मंगळवारपासून बेळगावसह राज्यभरात बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकजण बसमधून इच्छित ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. बसप्रवासाठी काही नियम पाळण्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे. पण क्वारन्टाईनचा शिक्का असलेले काहीजन बसप्रवास करीत आहेत. या घटनेमुळे आता परिवहन मंडळालाही खबरदारी घ्यावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrest 3 person Quarantine stamp on hand