सीमाभागातील विद्यार्थ्यांत संभ्रम : एक डोळा स्क्रीनवर तर दुसरा निर्णयाकडे!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

हजारो पदवी व पदव्युत्तर वर्गातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

निपाणी (बेळगाव): महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या सीमाभागातील हजारो पदवी व पदव्युत्तर वर्गातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्टडी फ्रॉम होम धोरणानुसार ऑनलाइन व्हच्युअल क्लासरुमचे धडे गिरविणारया या विद्यार्थ्यांचा एक डोळा अध्ययनासाठी स्क्रीनवर तर दुसरा डोळा युजीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाकडे लागला आहे.

अंतिम सत्राचा अभ्यासक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला असतानाच कोरोना संसर्गाच्या भीतीने दोन महिन्यापासून महाविद्यालये बंद आहेत. परिणामी शैक्षणिक भवितव्याच्या काळजीने विद्यार्थ्यांच्या मनात धस्स झाले. जिल्ह्यातील हजारो मराठी भाषक विद्यार्थी महाराष्ट्राच्या हद्दीतील कागल, गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले तालुक्याबरोबरच सांगली, लातूर, सोलापूर, उदगीर जिल्ह्यातील महाविद्यालयात कला, वाणिज्य व शास्त्र शाखेत शिकत आहेत. वैद्यकीय अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठीही शेकडो विद्यार्थी शिकत आहेत.

हेही वाचा- रत्नागिरीत 7 जणांना कोरोनाची लागण..संख्या गेली 113 वर...

कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षा व शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा आणि अन्य सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना युजीसी आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेड देऊन पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला होता. अभ्यासक्रम पूर्ततेसाठी महाविद्यालयीन पातळीवर ऑनलाइन वर्गही सुरू होते. परंतु विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता अंतिम वर्षाच्याही परीक्षा घेणे ही बाबच कठीण वाटत असल्याने त्या विद्यार्थ्यांनाही ग्रेड प्रदान करून निकाल देण्यासाठी यूजीसीकडे मार्गदर्शक सूचनांची आग्रही मागणी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे आता या परीक्षांबाबतही संभ्रम निर्माण होऊन विद्यार्थी गोंधळले आहेत.

हेही वाचा- राणे म्हणतात सिंधुदुर्गात होतो कोरोना रिपोर्टमध्ये चमत्कार .....कसा तो वाचा.

'ऑनलाइन अध्ययनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेक कठीण समस्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थितीचा विचार करून उपयुक्त अभ्यास पद्धती राबवावी. शिवाय आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील किमान सहा जिल्ह्यात शिकणाऱ्या अंतिम वर्षातील सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचा संभ्रमही त्वरित दूर करावा.'
 -प्रा. सुहास निव्हेकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, देवचंद महाविद्यालय-अर्जुननगर    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: border line student canfujan board exam in belgaum