esakal | पिक्चर अभी बाकी है? स्थित्यंतरे चंदेरी पडद्याची

बोलून बातमी शोधा

पिक्चर अभी बाकी है? स्थित्यंतरे चंदेरी पडद्याची
पिक्चर अभी बाकी है? स्थित्यंतरे चंदेरी पडद्याची
sakal_logo
By
शेखर जोशी, (९५५२५३१७८७)

सांगली : भारतीय चित्रपटसृष्टीने आता शतकी वाटचाल पूर्ण केली आहे. टुरिंग टॉकीज ते मल्टिप्लेक्‍स-ओटीटी असा चंदेरी दुनियेचा प्रवास आहे. मुंबईमध्ये फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी पहिल्यांदा चलत चित्रपटाचा प्रारंभ केला. त्याकाळात लघुपट विदेशातूनच येथे येत होते. त्यानंतर दादासाहेब फाळके या मराठी माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. 'राजा हरिश्‍चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट तयार झाला. तेव्हा चित्रपटगृहे नव्हती. उपलब्ध नाट्यगृहे, सभागृहे, मंगल कार्यालये, धर्मशाळातून चित्रपट दाखवले जायचे. तिथून सुरू झालेल्या या प्रवाहाशी सांगलीचे नाते आजही कायम आहे.

जगातले पहिले चित्रपटगृह १९०२ मध्ये लॉस एंजल्स येथे सुरू झाले. अर्थात फ्रान्स ही चित्रपट निर्मिती आणि त्याच्या विकासाची खरी राजधानी आहे. त्यानंतर अमेरिकेत हॉलिवूडचा जो विकास झाला. हळूहळू चित्रपटगृहे विकसित झाली. वॉर्नर ब्रदर्सनी याचे तंत्र विकसित केले. भारतात पहिले चित्रपटगृह कोलकत्ता येथे १९०७ मध्ये जमशेटजी मादन यांनी सुरू केले. सुरवातीचा काळ मुकपटाचा होता. पार्श्‍वसंगीत हे चित्रपटगृह किंवा तंबूमध्ये वाद्ये वाजवून दिले जायचे. १९३१ मध्ये 'आलामआरा' हा पहिला भारतीय बोलपट झळकला; तर प्रभात फिल्म कंपनीचा 'अयोध्येचा राजा' हा पहिला मराठी बोलपट प्रसिद्ध झाला आणि देशात करमणुकीच्या क्षेत्रात नाटक, तमाशे, लोककलांचे विविध खेळ आदी करमणुकीची लोक माध्यमे मागे पडून चित्रपट या कलेने सर्वांत आघाडी घेतली. या बदलात सांगलीदेखील आघाडीवर होते.

हेही वाचा: Video - पुतळे विक्रीतून जगणं केलं स्थिर

विष्णुदास भावे या आद्यनाटकारामुळे सांगली तर नाट्यपंढरी म्हणून लौकिकास आली होती. त्या काळात कोणत्याही नव्या नाटकाचा प्रारंभ सांगलीत होत असे. सांगलीतील सदासुख हे पहिले नाट्यगृह सारडा यांच्या मालकीचे, त्याचे उद्‌घाटन १८८७ मध्ये श्रीमंत धुंडीराज तात्या पटवर्धन यांच्या हस्ते झाल्याची ऐतिहासिक नोंद आहे. मात्र पुढे १९३८ मध्ये त्याचेच रुपांतर चित्रपटगृहात झाले. या चित्रपटगृहाच्या नूतनीकरणास बालगंधर्व उपस्थित होते. तथापि सांगलीतील पहिले चित्रपटगृह म्हणून आनंद चित्रपट मंदिराला मान मिळतो. बळवंत आपटे यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. सरदार टुरिंग टॉकीज नावाचे फिरते चित्रपटगृह होते. ते आपटे यांनी घेतले आणि १९३० मध्ये सध्या असलेल्या आनंद चित्रपटगृहाच्या ठिकाणी कमला टुरिंग टॉकीज या नावाने सुरू केले. आज जसा कोरोना आहे तशी त्यावेळचे ते दशक प्लेगची साथ होती अशाही नोंदी आहेत.

सांगलीच्या चित्रपटाच्या चंदेरी इतिहासाची साक्षीदार असलेले सदासुख तर कधी बंद झाले आणि त्या जागी आपार्टमेंट झाले हे कालप्रवाहात कळले देखील नाही आणि आजच्या मल्टिफ्लेक्‍स, नेटफ्लिक्‍स आणि ओटीटीच्या युगात आनंदची वास्तू केवळ एक साक्षीदार म्हणून उभी आहे. चित्रपटाच्या क्षेत्रात स्थित्यंतरे मोठी झाली तरी ती पूर्णपणे नामशेष होणार नाहीत. कारण ती केवळ एकट्याने बघण्याची कला नाही त्यामुळे कदाचित सध्याची चित्रपटगृहे कालबाह्य होतीलही. त्यांची जागा बहुपडदागृहे घेतील घेत आहेत. ओटीटीच्या रूपाने नवमाध्यमही खुले झाले आहे. होम थिएटर संकल्पानाही पुढे येईल; मात्र नव नव्या फॉर्ममध्ये ही समूहाने बघण्याची कला अवतार घेत राहील. ती अधिकाधिक तंत्रज्ञानावर स्वार होत जाईल. त्यामुळे त्रिमितपासून ते पुढील आधुनिक आविष्कारातून भविष्यात चित्रपटगृहाचे स्वरूपातही क्रांतिकारी बदल होतील आणि ती आनंद आणि लोकशिक्षण देत राहतील.