esakal | Video - पुतळे विक्रीतून जगणं केलं स्थिर

बोलून बातमी शोधा

null

Video - पुतळे विक्रीतून जगणं केलं स्थिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रुईकर कॉलनीतील उद्यानासमोर पुतळे बनविणाऱ्यांच्या आठ-नऊ झोपड्या, फूटपाथवर राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची रांग. कोल्हापुरात स्थायिक झालेला हा समाज. यांचे मूळ गुजरातमधले, पुतळे विक्रीसाठी हा समाज कोल्हापुरात आला आणि गांधीनगरचा रहिवासी झाला. तिथल्या पत्र्याच्या शेडमध्ये यांची कुटुंबे राहतात. पुतळे विक्रीसाठी त्यांना फूटपाथचा आधार मिळालाय. गेल्यावर्षी कोरोनाच्या लॉकडाउनमुळं आभाळ कोसळल्याची त्यांची भावना झाली. यंदाही त्यांच्या पुतळ्यांना गिऱ्हाईक नाही. त्यांच्या दिवसभरातील जगण्याचं हे चित्र.

प्रसंग सकाळचा : दया राठोड यांची फूटपाथवरची झोपडी. सकाळी लक्ष्मी उठल्या. छोट्या मुलगीला व मुलाला जाग आली. तिचं खाण्यासाठी रडणं सुरू झालं. झोपडीतली सारी भांडी रिकामी. भात करण्यासाठी तांदूळ नाही, चहाला दूध व साखर नाही. दया यांनी उठल्यानंतर पुतळ्यांच्या कामात लक्ष घातलं. तोवर लक्ष्मी यांनी मुलीच्या हातावर शिळ्या चपातीचा तुकडा ठेवला. सकाळी दहापर्यंत पुतळे खरेदीसाठी काहीजण आले. पाचशे रुपयांचा पुतळा शंभर रुपयाला त्यांना विकावा लागला. शंभर रुपयांत दूध, साखर, डाळेची खरेदी झाली. चुलीवर चहाला उकळी फुटली. यावेळी काही मुलांना पुतळे विक्रीसाठी बाहेर पाठवले.

हेही वाचा: World Book Day - 'स्टोरीटेल', 'ई-बुक्‍स'ना वाढणार मागणी

प्रसंग दुपारचा : लॉकडाउन अकरानंतर कडक झाले. दुपारच्या जेवणाचा प्रश्न होता. रात्रीचे काही शिळं जेवण आहे का, याचा शोध सुरू झाला. भाकरी व चपातीचे तुकडे होते. चुलीवर आमटी बनवली. त्यात ते तुकडे कुस्करले. झोपडीवर प्लास्टिकचा कागद. लक्ष्मी राठोड यांनी जवळच्या विहिरीवर जाऊन कपडे धुतले. त्या परत झोपडीत येऊन निवांत झाल्या. तोवर पुतळे विक्रीसाठी गेलेली मुले परत आली. दुचाकीवरून एक नागरिक आला. त्याच्या पिशवीत कपडे होते. ते देऊन परतताच राठोड कुटुंबीयांनी अन्य मुलांना कोणती कपडे बसतात, याचा अंदाज बांधला. त्यांना बोलावून त्यांच्या हाती ते कपडे दिले.

प्रसंग रात्रीचा : सायंकाळी पुन्हा झोपड्यात लगबग सुरू झाली. या झोपडीतून त्या झोपडीत मुले फिरत होती. पुतळे विकून मुलांनी आणलेल्या पैशात किराणा दुकानांतून काही माल खरेदी केला. प्रत्येक झोपडीत चित्र वेगळं होतं. रात्रीचा अंधार दाट होताना जेवणासाठी आज काय, असा प्रश्न होता. रात्री नऊनंतर काही नागरिक चपाती, भाकरी, भाजी घेऊन झोपड्यांत आले. त्याचा स्वीकार करत सर्वांनी जेवण उरकले. पुन्हा काहींचे हात कामात व्यस्त झाले.

हेही वाचा: जिल्ह्यातील कारखाने, उद्योगांचा ऑक्‍सिजन रुग्णांसाठी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

"पुतळे तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालात एक लाखाहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हा पैसा भरून काढण्याचे आव्हान आहे. वर्षभरात खूप नुकसान झाले. येत्या काळात हे नुकसान भरून काढू. कोल्हापुरातले लोक मदतीला धावून येणारे आहेत. त्यामुळेच आम्ही येथे स्थायिक झालो आहोत."

- दया राठोड