पंढरपुरातील कृत्रिम दुधाचे कनेक्‍शन बीड अन्‌ मुंबईपर्यंत 

प्रमोद बोडके
शनिवार, 11 जानेवारी 2020

तिरुमाला, वल्लभा, इंदापूर डेअरीला दूध पुरवठा 
श्रीराम दूध संकलन केंद्रातील भेसळयुक्त व कृत्रिम दुधाचा भोसेपाटी (ता. पंढरपूर) येथील तिरूमाला डेअरी व आजोती (ता. पंढरपूर) येथील वल्लभा डेअरी आणि करकंब येथील इंदापूर डेअरीला उमाबाई सीताराम गावडे व सीताराम गावडे या नावाने पुरविण्यात येत असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. या दुधाचे पुरवठादार, आरोपी व पुरवठादार यांची सांगड घालणारा तिरूमाला डेअरीचा पंढरपूर येथील केमिस्ट गोरख धांडे व तपासात निष्पन्न होत असलेले इतर आरोपी विठ्ठल ट्रान्स्पोर्टचे शिवाजी, ललित चंद्रकांत माधवी, संतोष बदाडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार व अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलमान्वये पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही सहाय्यक आयुक्त राऊत यांनी सांगितले. 

सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर अन्न प्रशासनाच्या पथकाने शुक्रवारी रात्री धाड टाकली. विना परवाना सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रावर कृत्रिम दूध तयार केले जात होते.या दूध संकलन केंद्रातून तब्बल चार लाख रुपयांचे साहित्य व कृत्रिम दूध हस्तगत करण्यात आले आहे. दूध भेसळीचा धंदा आता गावापर्यंत पोहोचल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. कृत्रिम दूध तयार करण्याचे आणि दूध भेसळीचे कनेक्‍शन सुगाव ते बीड, मुंबईपर्यंत असल्याचे समोर येऊ लागले आहे. 

aschim-maharashtra/crowd-devotees-bhagavangad-marathi-news-251309">हेही वाचा - भगवानगडावर फुलला भक्तीचा मळा 
श्रीराम दूध संकलन केंद्रावर पन्नास किलो मेलामाईन हा प्रतिबंधित पदार्थ आढळला. दुधात भेसळीसाठी हा पदार्थ वापरला जातो. श्रीराम दूध संकलन केंद्राचे मालक दत्तात्रेय महादेव जाधव ऊर्फ डॉक्‍टर (वय 40 रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर जि. सोलापूर) याच्याकडे अन्न प्रशासनाच्या पथकाने आणखी सखोल चौकशी केली. या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्याच्या पत्र्याच्या शेडवर शुक्रवारी रात्री धाड टाकली. जाधव यांचा नोकर व सहकारी गणेश हरी गवळी (वय 20) हा कृत्रिम दूध बनवत असताना या पथकाला आढळला. या शेडमध्ये दहा हजार दोनशे रुपये किमतीचे 51 किलो मेलामाईन, 19 हजार 140 रुपयांचे 638 लिटर भेसळयुक्त कृत्रिम दूध किंमत, 35 हजार 760 रुपये किमतीची 298 किलो दूध पावडर, एक लाख नऊ हजार नऊशे बारा रुपये किमतीची 1249 किलो व्हे परमीट पावडर, 98 हजार 880 रुपयांची 824 किलो लॅक्‍टोज पावडर, 14 हजार 900 रुपये किमतीचे 298 किलो पॅराफिन असा एकूण चार लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नाशवंत व भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झालेली ही कारवाई पहाटे चार वाजता पूर्ण झाली. 
हेही वाचा - सोलापूर झेडपीतील राष्ट्रवादीचे सहा सदस्य निलंबित 
अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, सहकारी अधिकारी भारत भोसले, मंगेश लवटे, उमेश भुसे व योगेश देशमुख यांनी ही कारवाई केली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. मेलामाईन रसायनावर बंदी घालण्यात आली आहे. या रसायनांचे सेवन केल्यास माणसाच्या किडन्या आणि फुप्पुस निकामी होते. हे घातक मेलामाईन रसायन या ठिकाणी आढळले आहे. पॅराफिन हे खनिज द्रव्ये देखील या ठिकाणी आढळले असल्याची माहिती सोलापूरच्या अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial milk connection from Pandharpur to Beed and Mumbai