सोलापूर झेडपीतील राष्ट्रवादीचे सहा सदस्य निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शितलादेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, मंगल वाघमोडे, गणेश पाटील व अरुण तोडकर या सहा सदस्यांना अध्यक्ष व उपाध्यपदाच्या निवडीत भाजप व समविचारी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्रिभुवन धाईंजे व उपाध्यक्षपदाचे उमेदवार विक्रांत पाटील यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत या सहा सदस्यांच्या विरोधात अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करणाऱ्या माळशिरस तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते बळिराम साठे यांनी याबाबतचे पत्र आज प्रसिद्ध केले आहे. या सहा सदस्यांना अपात्र करावे अशी मागणी गटनेते बळिराम साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची सोमवारी (ता. 13) सुनावणी होणार असून तत्पूर्वी राष्ट्रवादीने या सहा सदस्यांना निलंबित केले आहे. 

aschim-maharashtra/balasaheb-thorat-criticizes-fadnavis-marathi-news-251290">हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांनी नवीन ज्योतिषी शोधावा : थोरात 
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त उद्या (रविवार) अकलूजमध्ये विविध कार्यक्रम व शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजीमंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहणार आहेत. अकलूजमध्ये उद्या होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील भाजप व समविचारींचीही उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर भाजपची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत मंगळवारी (ता. 14) होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीची रणनीती ठरण्याची शक्‍यता आहे. उद्याच (रविवारी) कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शेकापच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सोलापुरात होणार असून या बैठकीत विषय समिती सभापतीच्या निवडीचे नियोजन केले जाणार आहे. 
हेही वाचा - सह्याद्री कारखान्यासाठी 167 उमेदवारांचे अर्ज 
सोलापूरची शिवसेना अस्वस्थ 
सोलापूरचे संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन गटात सोलापूरची शिवसेना विभागली आहे. डॉ. सावंत यांचे समर्थक असलेले सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. सहसंपर्कप्रमुख पद सध्या रिक्त असून सोलापूर विभागाच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील खदखद मांडली असून पक्षप्रमुख काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six NCP members suspended in Solapur ZP