अरुण लाड सांगलीचे बारावे आमदार 

बलराज पवार
Saturday, 5 December 2020

पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड हे विजयी झाले. या विजयाने ते सांगलीचे बारावे विद्यमान आमदार ठरले. 

सांगली : पदवीधर मतदार संघासाठी मोठ्या इर्षेने आणि चुरशीने मतदान झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच विक्रमी मतदानाची नोंद झाली. मात्र त्याचा निकाल अनपेक्षितरीत्या एकतर्फी लागला. गेल्या निवडणुकीत बंडखोरी करून आपली ताकद दाखवून देणारे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड हे विजयी झाले. या विजयाने ते सांगलीचे बारावे विद्यमान आमदार ठरले. 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. तब्बल 62 उमेदवार या निवडणुकीत उभे असले तरी मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही लढत स्वत:च्या प्रतिष्ठेची केली. त्यामुळे विक्रमी 57.96 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल ठरेल असे वाटत होते. प्रत्यक्षात चित्र उलटेच दिसले.

भाजपला या मतदार संघातील पाचही जिल्ह्यांत पदवीधरांनी झटका दिला. पुण्यातही अरुण लाड सरस ठरले. विशेष म्हणजे मतमोजणीच्या आधीच पुण्यात अरुण लाड हे आमदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले. यावरून पुण्यात महाविकास आघाडीने ताकदीने काम केले असल्याचा अंदाज येतो. 

भाजपला सलग तिसऱ्यांदा ही जागा जिंकण्याची इर्षा होती. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचे गेल्या 36 वर्षांचे वर्चस्व मोडून काढायचे आहे. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस दिसून आली. यातील राजकारणाचा भाग सोडला तर सांगलीला या निवडणुकीतून बारावा आमदार मिळणार हेसुद्धा महत्त्वाचे होते. 

सध्या जिल्ह्यात विधानसभेचे आठ तर विधान परिषदेचे तीन आमदार होते. आता यामध्ये आणखी एक आमदाराची भर पडली. यापूर्वीही जिल्ह्यात विधान सभेचे नऊ तर विधान परिषदेचे दोन-तीन आमदार असायचे. शिवाय 1995 पासून म्हणजेच युती शासनाच्या पहिल्या पर्वापासून 2014 पर्यंत किमान तीन मंत्रिपदेही होती. आघाडीच्या काळात तर राज्य मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट दर्जाची महत्त्वाची खाती असलेली मंत्रिपदे होती. शिवाय केंद्रातही एक राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे 20 वर्ष मंत्रिपदांचा सुकाळ असतानाही जिल्ह्याचा विकास काय झाला असे विचारले तर नकारात्मक उत्तर येते. 

सध्या जिल्ह्यात असलेल्या अकरा आमदारांमध्ये भाजपचे विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे प्रत्येकी दोन असे चार आमदार आहेत. तर कॉंग्रेसचे विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे एक असे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेचे तीन आमदार आहेत. शिवाय शिवसेनेचाही एक आमदार आहे. आता विधान परिषदेच्या निकालानंतर राष्ट्रवादीला जिल्ह्यात चौथा आमदार मिळाला आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आमदार असतानाही जिल्ह्यात विकासाचा बोऱ्या का उडाला आहे याचे उत्तर मिळत नाही हे परखड वास्तव आहे. 

जी. डी. बापूंच्या जयंतीदिनी अरुणअण्णा आमदार झाले
अरुण लाड यांचे वडील क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांची आज जयंती आहे. जी. डी. बापू स्वत: दोन वेळा आमदार होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अरुण लाड हेही आमदार झाले. योगायोग म्हणजे आज जी. डी. बापूंची जयंती आहे. याच दिवशी त्यांचे पुत्र आमदारपदी विजयी झाले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Lad becameTwelfth MLA of Sangli