
उरुन इस्लामपूरच्या पूर्वेला खोत यांची शेत जमीन आहे. अशोक, भरत व लक्ष्मण हे तिघे बंधू शेती करतात
नवेखेड - उरुण - इस्लामपूर (ता. वाळवा ) येथील प्रगतशील शेतकरी अशोक खोत यांनी खोडवा ऊस पिकामध्ये एकरी १२३ टन विक्रमी उत्पन्न घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेने काल या पुरस्काराची घोषणा केली. त्यांच्या उत्पन्नाने वाळवा तालुक्याच्या कृषी संस्कृतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
उरुन इस्लामपूरच्या पूर्वेला खोत यांची शेत जमीन आहे. अशोक, भरत व लक्ष्मण हे तिघे बंधू शेती करतात. अशोक यांनी या क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी एकरी १६७ टनाचे उत्पन्न घेतले होते. साधारणपणे खोडवा पिकाकडे पाण्याचा अनेक शेतकऱ्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. परंतु, खोडवा पिकाला उत्पादन खर्च कमी असल्याने खोडवा पीक जरा चांगले लक्ष दिले तर चांगले उत्पन्न मिळू शकते. यासंदर्भात बोलताना खोत म्हणाले २७ नोव्हेंबर २०१८ ला या क्षेत्रातील ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. पाच फुटी सरी असल्याने संपूर्ण पाचट सरीत दाबून घेण्यात आली. नंतर धारदार कोयत्याने बोडके छाटण्यात आले. लगेच बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करण्यातआली. त्याच वेळी पाचटावर एक पोते युरिया व दोन सुपर फॉस्फेट त्याचबरोबर १४ टन कंपोस्ट व दोन टन कोंबडी खत पुन्हा पाचतावर पसरण्यात आले. नंतर ठिबक भोड्यावर ठेवून संपूर्ण शेत भिजून घेतले. पहारीच्या साह्याने पहिला डोस देण्यात आला. 10 : 26 : 26 ४ पोती, युरिया १, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो व मायक्रो नेटरन्ट, गंधक प्रत्येकी 15 किलो, झिंक फेरस दहा किलो, बोरन दोन किल, ह्युमिक ऍसिड दहा किलो, फरटेरा आठ किलो, समृद्धी दहा पोती अशा पद्धतीने पहिला डोस देण्यात आला. नंतर ड्रीपने वेळोवेळी युरिया, 24 :24 :0, कॅल्शियम नायट्रेट अशा पद्धतीने सोडण्यात आले. एन. पी. के. जिवाणू खते तीन वेळा दिली पाच ते सहा वेळा संजीवकाची फवारणी केली. पूर्वी दिलेला पहारीच्या साह्याने खताचा डोस तीन महिन्यानंतर विरुद्ध बाजूने आहे, असा देण्यात आला. संपूर्ण क्षेत्राला मॉडेल स्प्रिंकलरचा वापर करण्यात आला. या मॉडल स्पिंकलरमुळे फेब्रुवारी ते जूनपर्यंत वाढणारे तापमान नियंत्रित करण्यात मदत झाली. सुमारे तीस फूट उंचीवरून स्पिंकलर बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे वेळोवेळी संजीवके ही फवारली. सुरुवातीपासूनच खोडवा पिकाचे सुयोग्य नियोजन केल्याने खोडवा ऊस चांगला वाढला.
हे पण वाचा - भेट इंदिरा गांधींची; कोल्हापूरच्या नेत्यांच्या हिंदीनं सुटला धरणाचा प्रश्न
गतवर्षी जानेवारीच्या दरम्यान हा खोडवा गळीतास गेला असता ३० गुंठ्यात ९२ मेट्रिक टन ४७५ किलोचे उत्पन्न त्यांना मिळाले. म्हणजेच एकरी १२३ टन इतके उत्पादन घेण्यात त्यांना यश आले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन व्ही. एस. आयने खोडवा पिकातील प्रथम क्रमांक देऊन गौरविले. त्यांना चांगल्या उत्पादनासाठी राजारामबापू कारखान्याचे शेती अधिकारी प्रशांत पाटील ,गटअधिकारी संग्राम पाटील, महेश कदम, कृशिभूषण संजीव माने, विजय जाधव, बाळासाहेब गुरव, बाळकृष्ण जमदग्नी, बीपी पाटील, अरुण मराठे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
संपादन - धनाजी सुर्वे