आष्टा शहरातील ग्रामीण रुग्णालय ‘असून अडचण नसून खोळंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

आष्टा शहरातील ग्रामीण रुग्णालय ‘असून अडचण नसून खोळंबा

आष्टा : पन्नास हजार लोकसंख्येच्या आष्टा शहरातील ग्रामीण रुग्णालय ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा स्थितीत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका रुग्णांना बसत आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुविधा नाहीत, अपेक्षित उपचार अन् शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अन् रुग्णालय प्रशासन यांच्यातील साठमारीत इमारतीची डागडुजी नाही की स्वच्छता. इमारतीच्या चार खोल्यांना गळती लागली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकीची रुग्णसेवा पगारापुरती उरली आहे. त्यांना रुग्णांचे सोयरसुतक नाही, अशा भावना रुग्णांतून व्यक्त होत आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन २०१० मध्ये येथे ग्रामीण रुग्णालय सुरू झाले. ३० खाटांचे रुग्णालय आहे, बाह्यरुग्ण तपासणी, औषध पुरवठा, बालरोग, स्त्रीरोग, पोस्टमार्टम, विभाग क्ष-किरण, प्रयोगशाळा आदी विभाग याठिकाणी सुरू आहेत.

कोरोना काळात डॉ. संतोष निगडी यांनी उत्कृष्ट काम केले. कोरोनाचे काम वगळता नेहमीच ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज वादग्रस्त ठरले आहे. रुग्णांना सेवा-सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचे प्रकारही घडले आहेत. ग्रामीण रुग्णालयात सुविधा मिळत नाहीत. स्त्रीरोगतज्ज्ञ असूनदेखील प्रसूतीचे प्रमाण महिना दोन असे अत्यल्प आहे. प्रसूतीच होत नसल्याने दोन बालरोगतज्ज्ञ अधिकारी आहेत. त्यांचा उपयोग काय, असा प्रश्न आहे. अस्थिरोग, पिशवी काढणे, सीझर, मोतीबिंदू, नसबंदी, लॅप्रोस्कोपी या अपेक्षित शस्त्रक्रिया होत नाहीत. डिजिटल एक्स-रे मशिन आहे, पण कायमस्वरुपी तंत्रज्ञ नाही. नेत्रतज्ज्ञ प्रतिनियुक्तीवर असल्याने आठवड्यातून एकच दिवस नेत्र तपासणी होते. प्रयोगशाळेत केवळ रक्तगट व किरकोळ तपासणी होते. अहवालासाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे गंभीर रुग्णांचे हाल होत आहेत.

रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. अँटिबायोटिक औषधांची कमतरता आहे. रक्तदाब, कॅल्शियम गोळ्या-टॉनिक नाहीत. धनुर्वात व इतर लसीही नाहीत. औषध मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत, प्रयोगशाळेसाठी पुरेशी जागा नाही, स्वतंत्र औषध भांडार, साठवणूक रूम नाही. वीज गेली तर जनरेटरची सुविधाही नाही.

तीस खाटांचे रुग्णालय आहे. दाखल रुग्ण नसल्याने प्रथमोपचार हाच उपचार बनला आहे. येईल त्या रुग्णाला सांगलीला पाठवले जाते. ग्रामीण रुग्णालय असूनही बाह्यरुग्णांची संख्या रोजची ७०-८० आहे. ती ३०० वर जाणे अपेक्षित आहे.

ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे अशी सरकारी आरोग्य यंत्रणा तैनात आहे, मोठ्या प्रमाणात निधीही मिळतो; तरीही या व्यवस्थेकडे अपवाद वगळता रुग्णांचा म्हणावा तेवढा ओढा नाही. त्याचे कारण सुविधांचा अभाव हे तर आहेच; त्याचबरोबर डॉक्टर निवासी नाहीत, रुग्णांची संख्या वाढावी ही मानसिकता नाही, इमारती आहेत; पण अत्याधुनिक तपासणी यंत्रणा नाही. या साऱ्यांचा ताण जिल्हा रुग्णालयांवर येत आहे. त्याचा लेखाजोखा घेणारी वृत्तमालिका आजपासून...

रुग्णांची पाठ

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीची डागडुजी, परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. चार खोल्यांना गळती लागली आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, रस्ते उखडले आहेत, परिसर झाडे-झुडपे, वेली वाढल्या आहेत. अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांची पडझड झाली आहे. तेथे विजेची व्यवस्था नाही. दवाखान्याच्या ठिकाणी अधिकारी मुक्कामास नसतात. शहरात जागृतीसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशा कारभारामुळे रुग्णांनी रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे.

...असे आहेत कर्मचारी

२५ पैकी कनिष्ठ लिपिक एक्स-रे टेक्निशियन, तीन अधिपरिचारिका, दोन शिपाई अशी पदे रिक्त आहेत. पोस्टमार्टम विभाग परिसरात कुत्र्यांचा वावर आहे. प्रतिबॉडी पाचशे रुपये देऊन खासगी व्यक्तीकडून शवविच्छेदन केले जाते.

Web Title: Ashta City Rural Hospital Problem But Hindrance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top