संजयकाका समर्थकावर प्राणघातक हल्ला; पडळकर समर्थक भिडले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

या प्रकरणी आटपाडी पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. हे दोन्ही नेते भाजपमध्ये आहेत,

आटपाडी (सांगली) ः खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले असून प्राणघातक हल्ला, गाडीवर हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी आटपाडी पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. हे दोन्ही नेते भाजपमध्ये आहेत, मात्र त्यांच्यात टोकाचा संघर्ष असून त्यांचे समर्थक याआधीही एकमेकांना भिडले होते. 

खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते, धनगर समाजातील उद्योजक विनायकराव मासाळ यांच्या आटपाडीतील बंगल्यावर पडळकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्याचवेळी पडळकर गटाचे विष्णू अर्जुन यांच्या गाडीवर त्यांच्या विरोधकांनी हल्ला करून नुकसान केले. याप्रकरणी काल रात्री उशिरा दोन्ही बाजूनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या. 

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दीपावलीनिमित्त मासाळवाडीची यात्रा होती. त्याला झेडपीचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, त्यांचे कार्यकर्ते गणेश भुते गेले होते. यावेळी भुते हे मंदिरात पायात चप्पल घालून गेल्याने गावातील तरुणाने त्यांना मारहाण केली. यावेळी ग्रामस्थांनी या प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी बारा वाजता मासाळवाडीतील खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते आणि उद्योजक विनायकराव मासाळ यांच्या राहत्या घरावर आठ ते दहा गाड्या भरून तरुणांनी तुफान दगडफेक केली.

घराबाहेर असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच घरांमध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांचा दोन भाऊ आणि आई जखमी झाल्या आहेत. दगडफेक करून हे तरुण पसार झाले, याबाबत रात्री उशिरा मासाळ कुटुंबीयांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पडळकर गटाचे कार्यकर्ते विष्णू अर्जुन यांच्या गाडीची विरोधकांनी हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. तसेच गाडीतील महिलेचे सोनेही ही चोरून नेले असल्याची तक्रार विष्णू अर्जुन यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारी मध्ये आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे, प्रा. एन.पी. खरजे, राजा अर्जुन यांच्यावर तक्रार दाखल केली आहे. 

या दोन गटात अनेक दिवसापासून टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. सोशल मीडियावर खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप केले जात होते. याशिवाय अनेक लहान-मोठ्या कुरघोड्या आणि कुरबुरी सुरू होत्या. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला हिंसक वळण लागले. यामध्ये धनगर समाजातीलच दोन्ही गट परस्परांच्या विरोधात उभे राहिले आहेत. वातावरण तणावाचे बनले आहे. 

यासंबंधी ब्रह्मदेव पडळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील आणि खासदार संजय पाटील यांचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. आयुक्‍त डॉ. सचिन मोटे यांनीही माझे सामाजिक कार्य डोळ्यात खुपल्याने खोटा गुन्हा दाखल करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. 

मासाळवाडीतील घटनेशी माझा कसलाही संबंध नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि खासदार संजय पाटील यांचे हे कारस्थान आहे. मी साऱ्या चौकशीला तयार आहे. 

- ब्रह्मानंद पडळकर, 
माजी समाज कल्याण सभापती 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault on Sanjaykaka supporter; Padalkar supporters clashed