तासगाव पोलिस ठाण्यातील  सहायक फौजदारास लाच घेताना अटक

रवींद्र माने
Saturday, 17 October 2020

चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना तासगाव पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार प्रवीणकुमार हणमंत तुपे (वय 57, रा. भवानीमळा, विटा, ता. खानापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

तासगाव (जि. सांगली ) : चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना तासगाव पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार प्रवीणकुमार हणमंत तुपे (वय 57, रा. भवानीमळा, विटा, ता. खानापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तासगाव पोलिस ठाण्यातील हा दुसरा सहायक फौजदार लाच घेताना वर्षभरात सापडला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव पोलिस ठाणे हद्दीतील एकावर चोरीचा आळ घेऊन त्याला मारहाण करण्यात आली होती. त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि आरोपी न बनवण्यासाठी सहायक फौजदार तुपे याने दोन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा तुपे याने गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रथम दोन हजार रुपये लाच मागून, नंतर एक हजारावर तडजोड मान्य केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीनंतर आज लावलेल्या सापळ्यात सहायक फौजदार तुपे हा एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तासगाव पोलिस ठाण्यातील दोन वर्षांतील ही तिसरी कारवाई आहे. पोलिस ठाण्यात झालेल्या कारवाईमुळे दिवसभर सन्नाटा पसरला होता. अटक केलेल्या तुपे याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाडगे, पोलिस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, कर्मचारी प्रीतम चौगुले, सलीम मकानदार, अविनाश सागर, सुहेल मुल्ला, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, भास्कर मोरे, सीमा माने, राधिका माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Faujdar of Tasgaon police station arrested for taking bribe