वरिष्ठ पातळीवरून दबाव, पण माणगंगेच्या आखाड्यात पाटलांचेच 'डावपेच' ठरले सरस; मिळवली एकहाती सत्ता I Atpadi Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manganga Sugar Factory Election

तानाजीराव पाटील यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणून माघारी घेण्यासाठी डाव टाकले होते, मात्र ते त्यात अडकले नाहीत.

Atpadi Politics : वरिष्ठ पातळीवरून दबाव, पण माणगंगेच्या आखाड्यात पाटलांचेच 'डावपेच' ठरले सरस; मिळवली एकहाती सत्ता

आटपाडी : माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Manganga Sugar Factory Election) जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (Tanajirao Patil) यांनी सांगोला तालुक्यातील नेत्यांचा मिळवलेला पाठिंबा, रचलेले डाव आणि कारखाना सभासदांचा ठेवून सुरू करण्याचा नेते मंडळींचा संपादन केलेला विश्वास, यामुळेच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना माणगंगेच्या आखाड्यातून माघार घ्यावी लागली.

माणगंगेच्या आखाड्यात देशमुख यांच्या तुलनेत तानाजीराव पाटील डावपेचांत सरस ठरल्याने यश मिळाले, असे चित्र दिसले. येथील माणगंगा साखर कारखान्याचे आटपाडी (Atpadi), सांगोला, आणि माण हे तीन तालुके कार्यक्षेत्र आहे. आटपाडी आणि सांगोला तालुक्यात सभासदांची संख्या मोठी आहे.

सांगोला तालुक्यातील सभासद शेतकरी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी निगडित आहेत. गेल्या पाच वर्षांपासून माणगंगा कारखाना बंद आहे. त्यातच टेंभू योजनेचे पाणी आटपाडी आणि सांगोला तालुक्यात आल्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. वाढत चाललेल्या उसाची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे.

नेमकी या गंभीर समस्येत तानाजीराव पाटील यांनी संधी शोधली आणि कारखान्याच्या निवडणुकीत यश मिळवले. सांगोला तालुक्यातील आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे आणि दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा शेतकऱ्यांची देणी देण्याबरोबरच कारखाना सभासदांचा ठेऊन चालू करण्याचा विश्वास मिळवण्यात यश मिळवले.

त्यामुळेच सांगोला तालुक्यातील एकमेकांचे तिन्ही विरोधक तानाजीराव पाटील यांनी कारखान्याच्या निमित्ताने पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले. हे काम इतके सोपे नक्कीच नव्हते. तुलनेत राजेंद्रअण्णा देशमुख यामध्ये खूपच कमी पडले. गेली ४० वर्षे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांना सोबत घेऊन ते कारखान्याची निवडणूक लढवत होते. तीच परंपरा त्यांनी यावेळी कायम ठेवली.

मात्र, गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहिले नाहीत. त्यांनी देशमुखांच्या पॅनेलमधून कार्यकर्त्यांचे भरलेले पाच उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी माघारी घेतले. तिथेच निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्याने देशमुखांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. सर्व शेतकऱ्यांची देणी देऊन कारखाना सभासदांचा ठेवून चालू करण्याचा विश्वास नेते मंडळी, कार्यकर्ते आणि लोकांचा मिळवण्यात देशमुख यांना अपयश आले. यामागे अनेक कारणे आहेत.

याशिवाय समोर डावपेच्यात सरस विरोधक असल्याचे माहीत असतानाही उमेदवारी अर्ज भरताना गाफील राहिले. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी ‘बी’ प्लॅन तयार ठेवला नाही. तानाजीराव पाटील यांचे कारखाना निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच रचलेले डावपेच यशस्वी होत गेले. सांगोला तालुक्यातील एकमेकांचे विरोधक असलेल्या तिन्ही दिग्गज नेत्यांचा पाठिंबा आणि कारखाना सुरू करण्याचा विश्वास मिळवण्यात यश मिळवले. ही सर्वांत मोठी जमेची बाजू ठरली.

तानाजीराव पाटील यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणून माघारी घेण्यासाठी डाव टाकले होते, मात्र ते त्यात अडकले नाहीत. त्यांनी विरोधकांचे डाव परतावून लावताना त्यांच्यावरच डाव टाकले. परिणामी, कारखान्यावरची ३७ वर्षांची सत्ता देशमुख यांना सोडावी लागली. बंद असलेला कारखाना तानाजीराव पाटील यांनी निवडणुकीतून मिळवला असला, तरी आत्ता त्यांच्यापुढे कारखाना सुरू करण्याचे अत्यंत कडवे आव्हान असणार आहे. येणाऱ्या काळात ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

कारखाना सभासदांचा ठेवून नीट चालू करू शकतो याचा विश्वास बांधावरच्या शेतकऱ्यापासून कार्यकर्ते आणि नेते मंडळींना आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. तुलनेत विरोधक समोरच्यांचा विश्वास मिळवण्यात पात्र ठरले नाहीत.

- तानाजीराव पाटील, संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक