
आटपाडी : कोट्यवधी खर्चूनही क्रीडा संकुल धूळ खात
दिघंची: आटपाडी तालुक्याचे क्रीडा संकुल म्हणून ओळखले जाणारे दिघंचीतील क्रीडा संकुल कोट्यवधी रुपये खर्चूनही चुकीच्या नियोजनामुळे धूळ खात पडले असून याकडे क्रीडा अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे. सुविधांअभावी ग्रामस्थ या क्रीडांगणावर जात नाहीत, सर्व सोईनियुक्त क्रीडांगण कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्याचे क्रीडांगण म्हणून येथील क्रीडांगणाची ओळख आहे. तत्कालीन आमदार सदाशिवराव पाटील यांनी आटपाडी येथे पुरेशी जागा उपलबध न झाल्यामुळे दिघंची येथे क्रीडा संकुल उभा केले. सुरुवातीला शासकीय निधीतून कोट्यवधी रुपयांचे काम झाले. यामध्ये संरक्षण भिंत, रनिंग ट्रॅक, हॉलीबाल क्रीडांगण व कुस्तीसाठी तालीम उभारले आहे. विजेचीही सुविधा देण्यात आली.
सध्या नियोजन शून्य असे लहान रनिंग ट्रॅक आहे. तर संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. कुस्तीसाठी बांधलेली तालीम पैलवानांअभावी ओस पडली आहे, तर हॉलीबाल क्रीडांगण उखडल्यामुळे खेळ होत नाही. येथे आवश्यक व मुबलक जागा असताना देखील नियोजनाच्या अभावामुळे कोणतीही खेळाची ट्रॅक नाहीत, तर खेळाच्या साहित्याची वानवा आहे. पहाटे व संध्याकाळी गावातील महिला युवक व जेष्ठ नागरिक फिरण्यासाठी राज्य मार्गाचा वापर करतात. या ठिकाणी अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणत आहे. यापूर्वी अनेकांनी जीव गमावले आहेत. अजून किती जीव गमावल्यावर येथील क्रीडांगण सुसज्ज होणार आहे. सध्या युवक-युवतींसाठी कोणतेही तज्ज्ञ क्रीडा अधिकारी नाहीत अथवा कोणाचे मार्गदर्शन मिळत नाही.शासनाने आमदार खासदारांनी याकडे लक्ष द्यावे व खेळांसाठी अद्ययावत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
Web Title: Atpadi Sports Complex Eats Dust Despite Spending Crores
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..