
आटपाडी : चांदी-सोन्यासह सहा लाखांची चोरी
आटपाडी : येथील मुख्य पेठेतील ओम गणेश ज्वेलर्स दुकान चोरट्यांनी फोडून २१ किलो चांदी, २०० ग्रॅम सोने आणि रोख पावणेसहा लाख रुपयावर डल्ला मारला. यमाजी पाटलाचीवाडी येथील शंकर रघुनाथ चव्हाण (वय ४५) यांचे अनेक वर्षांपासून ओम गणेश ज्वेलर्स मुख्य पेठेत सुरू आहे. आटपाडी व परिसरात त्यांच्या ज्वेलर्सचा लौकिक आहे. ग्राहकांची वर्दळ असते. त्यामुळेच दुकानात चांदी, सोन्याचा मोठा ऐवज ठेवला होता.
काल (ता. २६) रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेल्यावर मध्यरात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान तीन ते चार चोरट्यांनी दुकानाचे शटर कटावणीने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानात सीसीटीव्ही सुरू होता. यात तीन चोरटे स्पष्टपणे दिसत असून एक जण बाहेर असल्याचे दिसते. चोरट्यांनी लहान पैंजण असलेला चांदीचा सात किलोचा ऐवज, साडेसहा किलो चांदीची लहान व मोठी पैंजण, तीन किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, करंडा, ताटं, ग्लास आणि साडेचार किलो वजनाचे पायल अशी २१ किलो चांदी चोरली.
पोलिसांकडे सहा लाखांच्या मुद्देमालाची नोंद झाली असून बाजारातील किमत दहा लाख होते. तसेच दहा लाखाचे २०० ग्रॅम सोन्यांचे दागिनेही चोरीला गेलेत. दुकानात असलेल्या कपाटात २००० आणि ५०० च्या नोटा असलेल्या पाच लाख ७५ हजार रुपयावर चोरट्यांनी डल्ला मारला.
सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास शंकर चव्हाण आले असता त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तपासासाठी श्वानपथक मागवले होते. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.
Web Title: Atpadi Theft Six Lakhs Including Silver Gold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..