सांगली जिल्हा परिषदेच्या "वॉर रूम'मध्येच हल्ला

अजित झळके
Friday, 24 July 2020

जिल्हा परिषदेची यंत्रणा हादरवून टाकणारी बातमी आज सकाळी हाती आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात साथरोग नियंत्रण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाच कोरोनाने गाठले.

सांगली : जिल्हा परिषदेची यंत्रणा हादरवून टाकणारी बातमी आज सकाळी हाती आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात साथरोग नियंत्रण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाच कोरोनाने गाठले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरून गेली आहे. 

संबंधित बाधित अधिकारी सध्या कोरोना वॉर रूममध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या पत्नी आणि मुलालाही कोरोना झाला असून, त्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे कोरोना नियंत्रण जिल्हा परिषदेतील वॉर रूममधून केले जाते. तेथे काही अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या, त्यांच्या संपर्कात आलेले लोक, नाक्‍यावर अडवून तपासणी केलेल्याची माहिती यांचे संकलन करतात. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती, नवे रुग्ण, बरे झालेले रुग्ण, क्वारंटाईन लोक यांचा डाटा तेथे एकत्र केला जातो. या कक्षात संबंधित अधिकारी जबाबदारीचे काम करीत होते. आता त्यांनी या यंत्रणेतूनच कोरोनाची लागण झाली की त्यांचा संपर्क अन्यत्र कुठे आला होता, याबद्दल माहिती घेण्याचे काम सुरू आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात या अधिकाऱ्याची बैठकीला हजेरी होती. त्यामुळे त्यांचे कक्ष आता सॅनिटायझर करण्यात येत आहेत. संपूर्ण जिल्हा परिषद मुख्यालयात खबरदारीची उपाययोजना केली जात आहे. गेल्या आठवडाभरात जिल्हा परिषदेत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यात बदली प्रक्रियेच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. त्या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेले काही लोक हजर होते, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack in Sangli Zilla Parishad's "War Room"