हजेरी शाळांत.. मुले उसाच्या फडात! 

Attendance at schools .. Children in sugarcane trap!
Attendance at schools .. Children in sugarcane trap!

पाथर्डी : ऊसतोड मजुरांच्या पाल्यांची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे. विशेष म्हणजे शालाबाह्य विद्यार्थ्यांची उगाच कटकट नको, यासाठी गुरुजी त्यांची हजेरी लावून मोकळे होतात. इकडे ऊसतोडणी मजुरांची मुले आई-वडिलांसोबत गावोगावी भटकंती करीत आहेत. सक्तीचे शिक्षण कायद्याने बंधनकारक असताना, शिक्षण विभाग आणि कायद्याची जाण नसणाऱ्या पालकांनाही त्याचे काहीच देणे-घेणे नाही. 

ऊसतोडणीसाठी मजूर स्थलांतरीत 
चितळी येथील शेतात अशीच शालाबाह्य मुले आढळून आली. शाळकरी मुले उसाच्या फडात नि हजेरी लागते शाळांत, अशी अवस्था येथील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांची झाली आहे. महाराष्ट्रात यंदाच्या हंगामात सुमारे दीडशे कारखाने सुरू झाले. प्रत्येक कारखान्यास हजारांपेक्षा जास्त कुटुंबे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाली. प्रत्येक कुटुंबातील एक विद्यार्थी धरला, तरी किमान हजारांहून अधिक मुले शालाबाह्य राहत आहेत. 

हंगामी वसतिगृह 
ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी भरीव आर्थिक तरतूद केलेली असते. राज्यात हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी केंद्राने 2019-20मध्ये सुमारे 4364 लाख रुपये इतकी रक्कम प्रस्तावित केली. बीड जिल्ह्याला सर्वाधिक 2680 लाख रुपये निधी मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यासाठी 84 लाख इतकी रक्कम प्रस्तावित झाली. त्याच वेळी नगर जिल्हा निरंक आहे. हंगामी वसतिगृहांतून विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, औषधे, आरोग्य तपासणी, शालेय साहित्य, दैनंदिन साहित्यासाठी अनुदान मंजूर करण्यात येते. 
संबंधित शाळेत जादा तासिकेचा अंतर्भाव केला. मात्र, शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिले. पाथर्डी तालुक्‍यातील ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण विभागाच्या चुकीमुळे निधी मिळाला नाही. 

एकही स्थलांतरित नसल्याचा अहवाल 
पाथर्डी तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार दरवर्षी स्थलांतरित होतात. असे असताना, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने एकही विद्यार्थी स्थलांतरित झाला नसल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता, प्रत्येक वाडी-वस्तीवरील विद्यार्थी स्थलांतरित झाल्याचे दिसले. मात्र, मुख्याध्यापक या विद्यार्थ्यांची दररोज हजेरी लावतात. कागदोपत्री दिसणारा विद्यार्थी प्रत्यक्षात उसाच्या मोळ्या बांधत आहे. शासनाच्या हंगामी वसतिगृहाचा लाभ मिळाल्यास हे विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येऊ शकतात. 

अनेकजण स्थलांतरीत 
तालुक्‍यातील ऊसतोडणी, वीटभट्टी कामगार, मेंढपाळ, कोळसा काम करणाऱ्या मजुरांबरोबर मोठ्या प्रमाणात विद्यार्थीही स्थलांतरित झाले आहेत. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून हंगामी वसतिगृह सुरू करावे. शाळेने पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून द्यावा. जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमून पाथर्डीतील प्रकरणाचा तपास करावा व दोषींवर कारवाई करावी. 
- डॉ. उषा जायभाये, सामाजिक कार्यकर्त्या, पाथर्डी 

कोणीही स्थलांतरीत नाही 
शालाबाह्य मुलांचा अहवाल शाळा व केंद्र शाळांमार्फत मागितला असता, कोणत्याही शाळेतून विद्यार्थी स्थलांतरित झाल्याचे सांगितले नाही. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे. शाळांनी निरंक माहिती दिली आहे. 
- शिवाजी कराड, गटशिक्षणाधिकारी, पाथर्डी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com