मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या आश्वासनाकडे लक्ष; आज मिरजेत पाहणी दौरा

प्रमोद जेरे
Friday, 18 December 2020

पुणे ते कोल्हापूर आणि सोलापूर मार्गावरील अनेक प्रलंबित मागण्यांबाबत रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आज नेमके कोणते आश्वासन देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिरज (जि. सांगली) : पुणे ते कोल्हापूर आणि सोलापूर मार्गावरील अनेक प्रलंबित मागण्यांबाबत रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आज नेमके कोणते आश्वासन देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुर्डूवाडी ते मिरज या मार्गाची पाहणी करण्यासाठी महाव्यवस्थापक मित्तल हे आज सकाळी नऊ वाजता मिरजेला येत आहेत. केवळ दहा मिनिटे ते मिरज रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत, या कालावधीत विविध प्रवासी संघटना आणि व्यापारी तसेच अन्य संघटनांच्या प्रतिनिधींशीही ते चर्चा करणार आहेत.

महाव्यवस्थापक मित्तल यांच्या दौऱ्याबाबतची अधिकृत घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाकडून आज करण्यात आली. नियोजित दौऱ्याप्रमाणे महाव्यवस्थापक श्री. मित्तल हे सकाळी सहा वाजता कुर्डुवाडी येथून निघणार आहेत. कुर्डुवाडी, मोडनिंब, सांगोला, जतरोड, कवठेमहांकाळ, सलगरे, आरग या स्थानकांची पाहणी करणार आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, नवे पूल, तसेच अन्य नव्या कामांची पाहणी करत महाव्यवस्थापक मित्तल हे सकाळी नऊ वाजता मिरजेला पोहोचणार आहेत. 

सोलापूर मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या नव्या प्रवासी तसेच कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांबाबत मध्य रेल्वेचे नेमके धोरण काय आहे याचीही माहिती महाव्यवस्थापक मित्तल यांच्याकडून मिळणे अपेक्षित आहे. 

प्रमुख मागण्या 

  • कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, हुबळी, पुणे मार्गावर तातडीने पॅसेंजर, डेमु, मेमु गाड्या सुरू करणे. 
  • दुहेरी रेल्वे मार्ग त्वरित कार्यान्वित करणे. 
  • मिरज स्थानकात रखडलेली पिटलाईनची कामे सत्वर पूर्ण करणे. 
  • मिरज स्थानकाचे नूतनीकरण करणे. 
  • मिरज स्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था करणे. 
  • मिरज रेल्वे स्थानकावरील रखडलेले मॉलचे काम त्वरित पूर्ण करणे. 
  • स्थानकावरील प्रवाशांसाठीच्या सूचना मराठी भाषेत देणे. 
  • लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मिरजेचा आरक्षण कोठा वाढवणे. 
  • कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्‍सप्रेस तातडीने सुरू करणे. 
  •  कोल्हापूरहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सत्वर सुरू करणे. 

रेल्वे प्रशासनाकडून गुप्तता 
मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांसारखा उच्चपदस्थ अधिकारी महाराष्ट्रात बऱ्याच कालावधीनंतर दौऱ्यावर येत असताना याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. या परिसरातील कोणाही लोकप्रतिनिधी अथवा प्रवासी संघटनांना याबाबतची माहिती नाही. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attention to the assurances of the General Manager of Central Railway; Inspection tour in Miraj today