नाराज स्वाभिमानी संघटनेच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष | Election Results 2019

गणेश शिंदे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणूकीत नवखे उमेदवार धैर्यशिल माने यांच्याकडून पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विधानसभेचा उतारा अपेक्षित होता.

जयसिंगपूर - लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारांनी नाकारले. यामुळे नाराजीनाट्याला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनाच जर संघटना नको असेल तर तर आता वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा पवित्रा काहींनी घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणाऱ्या ऊस हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर ऊस दरासाठी दरवर्षी आयोजित ऊस परिषदेवरही अनिश्‍चिततेचे सावट आहे. कदाचित ऊस परिषद घेऊन संघटना आपली भूमिका जाहीर करु शकते. शिरोळ विधानसभेतील पराभावानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. 

लोकसभा निवडणूकीत नवखे उमेदवार धैर्यशिल माने यांच्याकडून पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विधानसभेचा उतारा अपेक्षित होता. यासाठी माजी खासदार शेट्टी यांनी शिरोळ तालुक्‍यातील गावागावात तळ ठोकून उमेदवार सावकर मादनाईक विजयासाठी कंबर कसली होती. मात्र, विधानसभेलाही पुन्हा स्वाभिमानी चळवळीच्या मुशीतून घडलेल्या आमदार उल्हास पाटील यांना मतदारांनी साथ दिल्याने स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. 

"चळवळ टिकली पाहिजे' हि टॅगलाईन घेऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. श्री मादनाईक यांच्यापेक्षाही चळवळीचा मुद्दा पुढे करुन स्वाभिमानीने प्रचार केला. मात्र, याचाही प्रभाव मतदानात दिसला नाही. मतदानानंतर विजय मिळाला नाही तर चळवळ थांबवावी का याचाही विचार झाला. यामध्येही दोन मतप्रवाह सुरु आहेत. यंदाच्या ऊस दराच्या मागणीसाठी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत याबाबतची नेमकी दिशा स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. शिरोळ तालुक्‍यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार झाला. 

तालुक्‍यातील ऊस दराची आंदोलने राज्यभर गाजली. ऊस आणि दूध दराच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गल्लीपासून दिल्लीपर्यंतची झेप घेतली. आमदार उल्हास पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी संघटनेची साथ सोडल्यानंतर तसेच अन्य कारणांमुळे संघटनेपुढे अनेक संकटे निर्माण झाली. भाजपशी साथ नंतरच्या काळात विरोध यानंतर कारखानदारांशी मनोमिलन आदी घडामोडी शेतकऱ्यांना रुजल्या नाहीत. याचा परिपाक लोकसभा निवडणूकीतून दिसून आला. विधानसभेच्या आशा असतानाही याठिकाणीही पदरी निराशाच आल्याने चळवळीपुढे आता पुढे काय करायचे हा यक्षप्रश्‍न उभा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attention to the role of angry Swabhimani organisation