औंध संस्‍थानचा ‘गजराज’ एकदम फिट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

‘पेटा’च्या आक्षेपानंतर झालेल्या शासकीय तपासणीत स्पष्ट; हत्ती सशक्‍त अाणि सक्षमही

औंध - औंध संस्थानचा गजराज हत्ती आपला डोमदार राजेशाही थाट दिमाखदारपणे मिरवित आजही सशक्त व सक्षम असल्याचे आज झालेल्या शासकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले. 

‘पेटा’च्या आक्षेपानंतर झालेल्या शासकीय तपासणीत स्पष्ट; हत्ती सशक्‍त अाणि सक्षमही

औंध - औंध संस्थानचा गजराज हत्ती आपला डोमदार राजेशाही थाट दिमाखदारपणे मिरवित आजही सशक्त व सक्षम असल्याचे आज झालेल्या शासकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले. 

जिल्हा वन अधिकारी व पुणे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागतिक पशु-पक्षी, वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था तथा ‘पेटा’ यांनी नोंदविलेल्या औंध संस्थानच्या गजराज हत्तीबाबत केलेल्या आक्षेपार्ह नोंदीनंतर आज औंध येथे गजराज हत्तीची सखोल तपासणी करण्यात आली. सर्वांचा जीवलग मित्र बनलेला गजराज ऊर्फ मोती दुसरीकडे न जाता आपल्याच सोबत कायम राहणार असल्याने औंधकरांनी सुटकेचा श्वास सोडला. 

‘पेटा’ संस्थेने केलेल्या आक्षेपार्ह नोंदीमध्ये गजराजास साखळदंडाने डांबून ठेवण्यात आलेले आहे. त्यास खोलवरती जखमा झालेल्या आहेत, त्याचे पालनपोषण व्यवस्थितपणे केले जात नाही, त्यास मोकळे ठेवले जात नाही, चांगल्या पालनपोषणाकरिता त्याला मथुरा येथील केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे व औंध संस्थानकडे केली होती.

त्यानुसार ही तपासणी झाली. आता वयोमानानुसार संस्थानच्या स्वमालकीच्या शेतात नेण्यात येते. दररोज आठ ते दहा किलोमीटर अंतर तो चालत आहे. म्हणून तो सशक्त व सक्षमही आहे. हा गजराज आजारी नाही. किरकोळ जखमा वगळता तो पूर्णपणे सक्षम आहे. तपासणी अहवालानंतरच्या उपचारासाठी योग्य औषधोपचार दिल्यानंतर या जखमा पूर्णपणे बऱ्या होतील, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

जंगलातून १९६६ मध्ये पळून आलेले १५ ते २० वर्षांचे हत्तीचे पिल्लू औंध संस्थानमध्ये दाखल झाले. ‘गजराज’ या नामकरणानंतरही  ‘मोती’ या टोपणनावाने तो सुपरिचित झाला. यापूर्वीपासून औंध संस्थानमध्ये दोन- तीन हत्ती जोपासले आहेत. हत्तींचे पालनपोषण, जोपासना करणारा माहूत समाज आजही औंधमध्ये सेवेत आहे. गजराज ऊर्फ मोतीचा माहूत राजू यायाखान महाट यांची सातवी पिढी काम पाहात आहे. हत्तीचा एका दिवसाचा पालनपोषणाचा खर्च तीन ते चार हजार रुपये आहे. वर्षातून एक ते दीड महिना कालावधीत त्यास साखळदंडाने बांधून ठेवण्यात येते. औंध संस्थानच्या शेतमालकीच्या जमिनीमध्ये त्याच्या आहारासाठी गवत, वैरण, तसेच ओलाचारा ऊस, घास गवत, कडवळ आदींची उपलब्धता सतत करण्यात येते. यापूर्वी यमाई मूळपीठ गडावरती व डोंगर परिसरात गवत खाण्यासाठी फिरविण्यात येत होते. आता वयोमानानुसार त्यास संस्थानच्या स्वमालकीच्या चार किलोमीटर अंतरावरील शेतात नेण्यात येते. 

‘गजराज’चे योग्य पालनपोषण - गायत्रीदेवी
‘गजराज’ हत्तीचे पालनपोषण योग्य पद्धतीने होत आहे. जखमांवर औषधोपचार सुरू आहेत. केवळ दीड ते दोन महिने तो साखळदंडाने बांधलेला असतो. ‘पेटा’च्या मागणीनुसार तो मथुरा केअर सेंटरमध्ये पाठविण्यास तयार आहोत. मात्र, या संस्थेने त्याच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घ्यावी, कोठे व कशा पद्धतीने सांभाळ करणार आहात, त्याबाबत प्रत्यक्ष, लेखी स्वरूपात खुलासा द्यावा, अशी मागणी औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केली आहे.

Web Title: aundh sansthan gajraj fit