
‘मराठी’च्या जागृतीसाठी काम करणाऱ्यांना पुरस्कार; श्रीपाल सबनीस
बेळगाव : सीमाप्रश्नाचा दावा सध्या सुप्रिम कोर्टात आहे. आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत बेळगावात कोणताही वाद-विवाद होऊ नये. मुळात हा प्रश्न सोडविण्याच्या जबाबदारी केंद्र व दोन्ही राज्य सरकारांनी घेतली पाहिजेत. या भाग केंद्रशासित करू नये, तसेच झाल्यास येथील नागरीकांनाच त्रास होणार आहे. कर्नाटक सरकारने ‘मराठी’च्या जागृतीसाठी काम करणाऱ्यांचा सन्मान पुरस्काराने केला पाहिजे, तरच तुमचे मराठीवरच प्रेम देशाला दिसेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर, यांच्यावतीने अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवारी (ता. ८) झाले. छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिजजवळ हे संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी केले.
ते पुढे म्हणाले, सत्तेची झुल बाजूला ठेवून महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. सार्वभौम भारत बननण्यासाठी संवादाच्या भूमिकेतून हा प्रश्न सोडवावा. कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारे अनेक साहित्यिक आहेत. मराठी व कानडी साहित्याचा केंद्रबिंदूही माणुसच आहे.
मराठी व कन्नड संघर्ष उपयोगाचे नाहीत. माणुस माणसावर अन्याय करणे हे चुकीचेच आहे. सहित्यिक हा अन्याय, विकृती, कुरुपता व वादविवाद याचे समर्थन करत नाही. अन्यायाविरोधातील त्यांचे लेखन असते. माय मराठी ही तुमची व आमची आहे. त्यापासून आम्हाला दूर ठवले जात आहे, हे चुकीचे आहे. शांततेच्या मार्गाने लाठी काठी न घेता संवादाच्या माध्यमातून कोणतेही प्रश्न सोडविणे गरजेचे आहेत. मराठी व कानडीने हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत. भारताचा तिरंगा अबाधित ठेवण्यासाठी एकसंघ झाले पाहिजेत. साहित्यिक सत्याची पूजा करत असतात. साहित्याचा मुख्य केंद्रबिंदू माणुस आहे. साहित्यिक दुखः देणारे नसतात, तर मानसाला विचार देणारे असतात. साहित्य हे राजकीय व्यवस्थेपेक्षा वेगळे असते. संतांनी दिलेले विचार जगाला पुरुन उरणारे आहेत. संत हे समाजाच्या कल्याणाकरीता आपले आयुष्य झिझवून समाज परिवर्तन आणि दिशा देण्याचे काम करत असतात.
वैश्विक जगांमध्ये सर्व भाषा द्वेष न करता, इतर भाषांही शिकल्या पाहिजेत. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण लवकर आत्मसात होण्यास मदत होते. बेळगाव परिसरातील अनेक साहित्य संमेलनांनी मराठी अस्मिता टिकविण्याचा प्रयत्न केला असून याची किर्ती जगभरात पसरली आहे. मराठी भाषेतील साहित्य जगभरात पोहचायचे असेल तर इतर भाषांचा अभ्यास करून अनुवादित करणे खुप गरजेचे आहे. व्यासपीठावर अभामसा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, राज्यअध्यक्ष, स्वागताध्यक्ष रविंद्र पाटील, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, महादेव चौगुले, दिगंबर पवार, आप्पासाहेब गुरव, ए. के. पाटील, आर. एम.चौगुले, रणजीत चव्हाण पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, राजेंद्र मुतगेकर, सिद्धार्थ हुंद्रे, अरुणा गोजे-पाटील, चेतन पाटील आदी होते.