
सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मोर्चाबाबत आतापासुनच जनजागृती करण्यास सुरुवात झाली
बेळगाव : महापालीके समोर लावण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा यासाठी 21 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येणार असुन जनजागृती बाबतची रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच 17 जानेवारी हुतात्मा दिन कार्यक्रम यशस्वी करण्याबाबतही बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.
महापालीकेसमोर अनधिकृतपणे लावण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटवावा अशी मागणी सातत्याने शहरवाशीयांमधुन होत आहे. परंतु प्रशासन कन्नड संघटनाना पाठीशी घालीत आहे. त्यामुळे महापालीकेवर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर तालुका समिती, शहर समिती, शिवसेना व युवा समितीतर्फे बैठक घेऊन मोर्चा व 17 जानेवारी रोजी हुतात्मांना करण्यात येणाऱ्या अभिवादन कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मात्र विभागवार बैठका घेऊन मोर्चात अधिक संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे यासाठी समिती प्रयत्नशिल आहे. त्यामुळेच मोर्चाबाबत अधिक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मोर्चाबाबत आतापासुनच जनजागृती करण्यास सुरुवात झाली असुन युवकांकडुन विविध प्रकारचे संदेश पाठवुन मोर्चा यशस्वी करण्याबाबत आवाहन केले जात आहे. म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने लवकरच गावागावात जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असुन सांयकाळच्या सत्रात काही गावांमध्ये सभा घेण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे.
हेही वाचा- काय का असेना पण मतदार विमानातून प्रवास करतो हेच वैशिष्ट्य
महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्यावतीने तालुक्याच्या विविध भागात जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका समितीच्या बैठकीत मोर्चा व हुतात्मा दिनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. गावागावात फिरुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.
संतोष मंडलीक, अध्यक्ष म. ए. समिती युवा आघाडी
संपादन - अर्चना बनगे