Ayodhya Ram Mandir, Samarth Ramdas Swami : प्रत्‍येकाला 'समर्थ' बनवणारा 'रामराया'

समर्थ श्रीरामाने अनेकांना आपल्यासारखेच समर्थ केल्याचे श्रुती स्मृतिपुराणे गर्जून सांगत असतात.
Ayodhya Ram Mandir Samarth Ramdas swami
Ayodhya Ram Mandir Samarth Ramdas swamiesakal
Summary

श्री शिवरायांची प्रत्येक हालचाल आणि छत्रपती शिवरायांकडे पाहून श्रीसमर्थांना श्रीरामाचेच स्मरण होत असे.

-शरद कुबेर, सातारा

समर्थाने समर्थ करावे । तरीच समर्थ म्हणवावे ।

त्रैलोक्यासी पडिले ठावे । सामर्थ्य ज्याचे

श्रीसमर्थांचा जन्म अशा पावन कुळात झाला की, ज्या कुळात २३ पिढ्या सूर्यनारायण आणि सूर्यवंशी श्रीराम यांची उपासना नित्य होत होती. सर्वाथाने ‘धन्य ते कुळ, धन्य तो वंश, ज्या कुळीं रामदास अवतरले’

‘सौंदर्योवागुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीयः।’

श्रीरामाचे चरित्र आणि चारित्र्य यांचा ‘प्रेमा’ त्यांना वंशपरंपरागत ‘सुकृताचा ठेवा’ म्हणून लाभला होता. श्रीरामचरणांच्या ध्यासावर कोणतेही मळभ कोवळ्या मनावर कधीच आले नाही, साचले नाही. अगदी बालवयात त्यांना आपल्या जीवित कार्याचा बोध झाला होता. ‘हे विश्व माझे घर’ आहे, अशी त्यांची मती आणि धारणा स्थिर आणि दृढ होती. विश्वाच्या संसार -पसाऱ्यात जनांचा प्रवाह विनाशाकडे अप्रतिहत खेचला जातो आहे. त्यांच्या आर्त वेद‌नांनी असहाय्य झाला आहे. बुडत चाललेल्या डोळ्यांनी त्यांना पाहवत नाहीत. त्यांच्याबद्दल वाटणारा कळवळा स्वस्थ बसू देत नाही. म्हणून करुणार्द्र स्वराने श्रीरामरायास आळवून त्याचा धावा आरंभिला.

Ayodhya Ram Mandir Samarth Ramdas swami
तब्बल 25 हजार चौरस फूट जागेत साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिअयोध्या; 167 खांब, 20×39 चा गाभारा अन् बरंच काही..

श्रीमारुतीरायाच्या मध्यस्थीने जांबेच्या पंचवटी क्षेत्रात श्रीरामरायाचे दर्शन झाले. श्रीरामरायांनी त्यांना मांडीवर घेतले. त्यांचे मुख कुरवाळले आणि कृपादृष्टीने अवलोकन केले. मग, पुन्हा मारुतीरायाच्या हाती सोपविले ‘पाहिजे सांभाळिले’ अशी आज्ञाच श्रीमारुतीरा यांना केली. श्रीमारुतीरा यांनी त्या श्रीगुरूंच्‍या आज्ञेचे पालन केले. जांबेच्या लग्नमंडपातून सतत सावधान आणि दक्ष असलेला नारायण अचानक अवतरला आणि नाशिकच्या करुणाकर श्रीरामापुढे नतमस्तक झाला. अष्टांगयोगपूर्वक नमस्कार करून स्निघ्नतेने ओथंबलेल्या श्रीरामरायाची त्यांनी केलेली प्रार्थना शीर्षस्थानी उद्धृत केली आहे.

श्रीसमर्थ श्रीरामास ‘समर्थ’ म्हणत असत. या समर्थ श्रीरामाने अनेकांना आपल्यासारखेच समर्थ केल्याचे श्रुती स्मृतिपुराणे गर्जून सांगत असतात. मग, या रामदासाला समर्थ केलेच पाहिजे ना? या प्रार्थनेच्या आतुरतेने श्रीराम समर्थांशी मिळून गेले. दासपण सरले, स्वामीपण राहिले. दास आणि राम एकच झाले. नारायण रामदासात एकरूप ‘समर्थ रामदास’ झाले. पूर्वांपार चालत आलेली श्रीरामभक्‍ती ‘दृढ परी दृढवाया।’ श्री समर्थांनी ‘श्री सूर्यनारायणाचा गायत्री आणि श्रीरामरायाचा तारक मंत्र’ यांचे जपानुष्ठान सुरू केले. दिनमानाचा काळ अनुष्ठानात जात असला तरी अचपळ मन आवरण्यासाठी उर्वरित काळ त्यांनी हृदयस्थ आराध्याचे चरित्र श्रवण, मनन करण्यात घालविला.

त्यातून श्री वाल्‍मीकी रामायण स्वहस्ते लिहून काढण्याचा संकल्प स्फुरला. नेमस्तपणे घोटलेले कागद, शाईचे सामे-सामग्री, सुऱ्या कातऱ्या, खळ, सिसेलोळ्या, हरितद्रव्ये, नाना प्रकारचे नाना देशांचे बोरू मिळविले. अक्षर मात्र तितुके नीटच होते. गिरवून गिरवून सुंदर केले होतेच. वळणदार, नेटके अक्षर, कानामात्रा तपासून ‘चुकताच कामा नये’ असा दंडक पाळणाऱ्या एकसारख्या मोत्यांच्या माळेसारख्या काळ्या कुळकुळीत ओळी हे बालवयात कष्ट घेऊन सिद्ध केल्यामुळे इतरेजनास मोहक वाटेल इतके सुंदर होते.

श्री वाल्‍मीकी रामायण लिहिण्यास प्रारंभ

अशा उत्तम लेखनास सिद्ध असलेल्या रामदासांनी श्री वाल्‍मीकी रामायण लिहिण्यास सुरुवात केली. बालकांडाचा पहिला ‘श्रीगणेशाय नमः’ श्लोक लिहिला आणि तप: स्वाध्यायनिरत वाल्मीकी ऋषींच्या दिव्य आणि प्रगाढ प्रतिभेने श्रीसमर्थ विचारमग्न झाले. श्रीराम त्यांचे आदर्श, आराध्य दैवत होते. पण, रामायणाच्या सुरुवातीसच आलेल्या श्रीरामाच्या एकेक गुणाच्या आस्वादाने समर्थ चिंतनात मग्न झाले. आदर्शाच्या अत्युच्च स्तरावरील हे श्रीरामाचे गुणवर्णन आद‌र्शाच्या आचरणाकडे मनाला चुंबकासारखे आकर्षित करू लागले. ‘आपणहि व्हावे त्यासम’ हा विचार दृढ होऊ लागला. तो आदर्श मनात झिरपू लागला.

Ayodhya Ram Mandir Samarth Ramdas swami
Ayodhya Ram Mandir : अटकेत असतानाच केला श्रीराम याग; कारसेवक मधू आठल्येंनी जागविल्या बंदिवासातल्या आठवणी

स्वत: श्री वाल्‍मीकींनी महर्षी नारदांना विचारताना, ‘को न्वस्मित्सांप्रतं लोके गुणवान्कश्च वीर्यवान्।’ धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवाक, दृढव्रतः, चारित्र्यसंपन्न, सर्वभूतहितेरत:, विद्वान्, समर्थ, प्रियदर्शनः आत्मवान् ‘जितक्रोधो, द्युतिमान्, अनसूयक, संतप्त असताना देवही घाबरतील अशा गुणांनी युक्त कोणी आहे का?’ या प्रश्नाने वाल्मीकीमुनी नारदांना समयोचित उत्तर देण्यास प्रवृत्त करतात. रामायणाची वाटचाल सुरू झाली. श्रीसमर्थांनी तीन वर्षांत पांच कांडे स्वहस्ते लिहून काढली आणि शाईच्या माध्यमातून कागदावर बोरू, शाईच्या माध्यमातून, पण त्यांच्या अंत:करणावर श्रीरामाचे गुणवर्णन करणारे प्रसंग दृढतेने कोरले गेले. पुढील आयुष्यात जेव्हा जेव्हा आपत्तीसमान प्रसंगांना सामोरे जावे लागले. तेव्हा तेव्हा या श्रीराम चरित्रातील आदर्शांचा आधार श्रीसमर्थांनी घेतला.

मनाते दमवावे (‘श्रीरामी रमावे’)

दिगांती फिरावे (‘जना ना स्मरावे’)

अशा अनुष्ठानाच्या काळात अगदी परीक्षाच पाहणारा प्रसंग म्हणजे प्रभू रामचंद्रांनी अनुष्ठान पुरे करून ‘दक्षिण प्रांती शिवकल्याण राजा जन्मास आला आहे, तातडीने त्या प्रांती जावे’ असे आग्रहाने सांगणे. साधकाला आराध्याने साधना पुरी करण्याची लगबग केल्यावर केव्हा एकदा आज्ञापालन करतो, असे होईल. पण, श्रीसमर्थ दृढव्रती होते. धर्मज्ञ होते. सत्यवाची होते.

साधनेचे अपेक्षित फलित निश्चित केलेले असल्याने अनुष्ठानमध्ये थांबविणे साधक धर्माला बाधकच झाले असते. गायत्री मंत्राचा, तारक मंत्राचा संकल्प पूर्ण करणे हे असत्य वचन होणार नाही, ही दक्षता बाळगणे आवश्यकच होते. पण, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नव्या ध्येयनिष्ठ शिष्य वर्गापुढे गुरूंचा आदर्श ठेवायचा होता. तो आदर्श लेचापेचा असून चालणार नव्हता. चारित्र्यसंपन्नेबाबत श्रीसमर्थ अतिशय दक्ष होते.

आपल्या संप्रदायात स्त्रिया, वैश्य, शूद्र, अशा सर्वांना पण आत्मज्ञानाची कवाडे उघडी करणाच्या वेदधर्मप्रणित सनातन आर्य संस्कृतीचा आधार डळमळीत होऊ नये म्हणून चारित्र्य संपन्नता हे संरक्षक कवच ठरते. स्त्रियांना शिष्यत्व, महंती बहाल करताना धर्ममार्तंडाचा पोटशूळ तर उठणारच. त्यांच्या थोरल्या बंधूनी, श्रेष्ठांनी त्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. त्यास श्रीसमर्थांनी पाठविलेले उत्तर मनोहर आहे.

‘संपन्न तारुण्य लावण्य नारी ।

कौशल्यता वैभव चित्तहारी।

एकांतकाळी पडतां समंधु।

अभिलाष न करी तो धन्य साधु ।।

Ayodhya Ram Mandir Samarth Ramdas swami
Dafalapur Ram Mandir : शिवशाही काळातील डफळापुरातील प्राचीन राम मंदिर; जाणून घ्या काय आहे खासियत?

वाल्मीकी रामायणात न आलेली पण लोकांत प्रचलित असलेली, पार्वतीने श्रीरामाची परीक्षा घेतलेली कथा, हाच श्री समर्थांचा आदर्श होता. ‘परस्त्री नारी, मातेसमान’ ही चारित्र संपन्नतेची गुरुकिल्लीच आहे. प्रभू श्रीराम सर्वच भूतमात्रांचे कल्याण कशात आहे, याच विचाराने आचरण करीत असत. म्हणून त्यांनी चित्रकुटावरील अतिशय उत्तम निवासस्थान सोडून दंडकारण्याच्या कष्टप्रद प्रदेशाकडे वाटचाल केली. भरत भेटीनंतर कारण-अकारण अयोध्यावासी येत राहतील. चित्रकुटाचा शांत निसर्ग शापित व कुपित होईल व त्यातून वनवासाच्या उद्देशास बाधा येईल, ते श्रीरामांना नको होते.

धटासी आणावा धट’ असा व्यवहारी उपदेश करणारे समर्थ, शिष्यांच्या अतिशय कठोर परीक्षा घेणारा समर्थ, माधुकरीसाठी आलेल्या शिष्याला भीती घालणाऱ्या भोंदूला वठणीवर आणणारे समर्थ, हेतू सफल झाल्यावर वसंतातल्या कोवळ्या लुसलुशित नव्हाळीपेक्षाही मृदू-कोमल अंतःकरणाचे होतात. सतत दुसऱ्याचे कल्याण करण्याचाच भाव आणि स्वभाव असणाऱ्या श्रीसमर्थांच्या अंतःकरणातील श्रीरामच हे सर्व घडवून आणतात.

सर्व विद्या अभ्यासातून आत्मसात

श्रीसमर्थांनी जनहितकर सर्व विद्यांचा अभ्यास करून त्या आत्मसात केलेल्या होत्या. त्यामुळेच श्रीरामचंद्रांप्रमाणेच ते सर्व कला पारंगत होते. जीवनातील कोणत्याही अंगाची त्यांनी उपेक्षा केली नाही. त्यातही नवविधा भक्‍तीसाठी त्यांना आवश्यक ती उत्कटता, गुणासह त्यांना अवगत होती.

Ayodhya Ram Mandir Samarth Ramdas swami
नर्मदेच्या डोहात पाषाण भक्‍तीने प्रकटे 'काळाराम'; रामदास स्‍वामींच्‍या हस्‍ते 1665 मध्ये साताऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना

प्रभू रामचंद्रांनी वालीवर जय मिळवला. पण, राज्य सुग्रीवास अर्पण केले. रावणावर विजय मिळविला. पण, राज्य विभिषणास दिले. श्रीसमर्थांनी अशी नि:स्पृहता, वैराग्य, त्यागवृत्ती रामायण कथेतून अंगीकारली होती.

सदा मागता दास देवा न साहे। न मागे तयाची रमा होय दासी ।

असे आस तो दास जाला जगाचा । नसे आस तो ईशु ब्रह्मादिकांचा ।

त्यामुळे छत्रपती शिवरायासारखा अनन्य शरण असूनही त्यांना माया, मोह स्पर्श करू शकला नाही. ‘‘वाटे वैभव तुच्छ ज्यास असुनी सिद्धी जयाच्या करी’’ असे सर्व श्रीमंत शिष्य ज्यांना लाभले त्या श्रीसमर्थांची थोरवी तरी कशी वर्णन करावी? हे सर्व श्रीराम कृपेनेच प्राप्त होते.

भिक्षे स्वामी जाता । नुरे भवव्यथा,आनंदी मग्नता जयकारी ।

मृदु मंजूळ तो ध्वनि की श्लोकांचा, ऐकता ज्याचा मन निवे।।

श्रीसमर्थांचे स्मरण, दर्शन, स्पर्शन, सर्व काही प्रिजय दर्शन होते. आल्हाददायक होते. हा अलौकिक गुण श्रीराम कथेतून श्रीसमर्थांच्या ठिकाणी अवतीर्ण झाला होता. क्रोधावर संपूर्ण विजय मिळविलेल्या प्रभू रामचंद्रांनी पराभुताला देखील सन्मान दिला. त्याच्या उत्तम गुणांची प्रशंसा केली. मुळात दृष्टीत काहीच किल्मिष नसल्याने प्रत्येक घटनेकडे ते स्वच्छ नजरेने पाहू शकत होते आणि समोरच्याचा दुष्ट भाव जाणूनही त्याला क्षमा करण्याचे सामर्थ्य प्रभू रामचंद्रांमध्ये होते. श्रीसमर्थांच्या जीवनात अशा अनेक प्रसंगांची अनुभूती येते. परनिंदा हे दूषण श्रीसमर्थांच्या आसपासही येऊ शकत नाही.

Ayodhya Ram Mandir Samarth Ramdas swami
Kolhapur Ram Mandir : अवघा भारत झाला राममय! 'ही' आहेत कोल्हापुरातील प्रभू श्रीरामांची ऐतिहासिक तीर्थस्थाने

‘प्रभू रामचंद्र’ यांच्या आचार, विचारांचा मोठा प्रभाव श्रीसमर्थांच्या जीवन चरित्रावर पडलेला आहे. देहरुपाने दोघे भिन्न काळातील भिन्न देहधारी भासले, तरी सत्य आणि नित्य परब्रह्मस्वरूप प्रभू रामचंद्रांची या कलियुगातील अवतार मूर्ती म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामी होय. अंतर्बाह्य श्रीराम स्वरूप असणारे श्रीसमर्थ रामदासस्वामी कलियुगात मारुती अंशाने धर्मग्लानी घालवून चैतन्य आणून, प्रभू रामरायाची पर्यायाने धर्माची सेवा दासभावाने करण्यासाठी अवतीर्ण झाले. केवळ त्याच कारणासाठी छत्रपती शिवराय ही महाराष्ट्रास लाभले.

श्रीसमर्थांना अपेक्षित अशा रामराज्याची धुरा पेलणारा महान शककर्ता आला. आनंदवनभुवन निर्माण झाले. महाराष्ट्रास सिंहासनाधिश्वर छत्रपती मिळाले. म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे श्रीसमर्थांच्या दृष्टीने प्रभू रामचंद्रांचाच राज्याभिषेक होता. श्री शिवरायांची प्रत्येक हालचाल आणि छत्रपती शिवरायांकडे पाहून श्रीसमर्थांना श्रीरामाचेच स्मरण होत असे. तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज, श्रीसमर्थ रामदास स्वामी आणि विग्रहवान धर्मच असलेले प्रभू रामचंद्र हे एकात्म आहेत.

जय जय रघुवीर समर्थ ।

श्रीरामो विजयते ।।

(लेखक धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिराचे माजी अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com