esakal | हौसेला मोल नसतं; गायीच्या डोहाळे जेवणाची पंचक्रोशीत चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

हौसेला मोल नसतं; गायीच्या डोहाळे जेवणाची पंचक्रोशीत चर्चा

शिंग्या शेब्या, मखमली झुल, हार फुले, गजरे सजरे, साड्या कंकण आदीं प्रकारांनी गाईला सजवली.

हौसेला मोल नसतं; गायीच्या डोहाळे जेवणाची पंचक्रोशीत चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आष्टा : शिंग्या- शेंब्या, गजर -सजर, हार फुलं, अंगावर मखमली झूल...तिला आज सजवलं होतं. पंचवीस पक्वान्नांचा बेत. चारशे लोकांना आवतंन. पै पाहुण्यांना आहेर माहेर. गायीच्या फोटोचं वाटप. नवरात्रीच्या चौथ्या माळेला जाम बेत होता गायीच्या डोहाळे जेवणाचा. सागर कृष्णा सिद्ध यांचं हे नेटके संयोजन खिलार जनावरांचे संवर्धन करा असा संदेश देणारे होते.

सागर भाऊ म्हणजे भन्नाट माणूस. बैल व बैलगाडी शौकीन. बैल व गाय यांच्यावर त्याचे नितांत प्रेम. बंगल्यासमोरच वडिलांनी पाडी बांधलेली. तीचं रोजचं हंबरनं अन् चाटणं यामुळे सागरला पाडीचा लळा लागला. मुलाप्रमाणे त्यानं तिला खुराकच सुरू केला. लेकराप्रमाणे रोज आंघोळ, वेळच्या वेळी वैरण खाणेपिणे, व्यायाम अन् कुरवाळणं. बघता बघता ती वयात आली. तिला भरवण्यात आली. सातव्या महिन्यात परंपरेनुसार डोहाळे जेवणाचा बेत केला.

हेही वाचा: जुळ्या बहिणींची कमाल; १६ लढतीत १४ सुवर्ण कमाईने धमाल

दोरुदय अपभ्रंश डोहाळे (ओटी भरणे) महिलांत नावेतील, झोपाळ्यावरील, धनुष्यबाणातील, हरणाच्या आकार, मंदिरातील, चांदण्यातील, अशा अकरा प्रकारे ओटी भरतात. गर्भावर संस्कार व्हावेत हा उद्देश. सागरभाऊंनीदेखील गाईसाठी ‘शिवारभरण ओटी’ नाव दिलं. हरेक प्रकारचा ओला-सुका चारा गोळा केला. पै पाहुणे, मित्र, नातेवाईकांना आमंत्रण धाडली. पुरी-बासुंदी, खाज्या, जिलेबी, लाडू, चकवान, कडधान्यं, तळीव, फळे असा अन्नपदार्थांचा बेत केला. मेजवानीच सर्वांसाठी.

शिंग्या शेब्या, मखमली झुल, हार फुले, गजरे सजरे, साड्या कंकण आदीं प्रकारांनी गाईला सजवली. सारी आरास केली. ओटी भरण्याचा दिमाखदार सोहळा झाला. महिलांनी औक्षण केलं. गीते गायीली. सागरभाऊंनी उपस्थितांना गाईची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, पलूसचे उद्योगपती रामचंद्र डाळे, कुमार डाळे, उद्योगपती राजू पाटील, कृष्णा सिद्ध, रामचंद्र सिद्ध, शशिकांत भानुसे, माणिक भानुसे, संगीता सिद्ध, प्राची सिद्ध, दत्ता ढोले यांनी आहेर माहेर करीत सोहळा सजला. मान्यवरांच्या भेटीने सोहळ्‍याला इव्हेंटचे स्वरूप आले.

हेही वाचा: खासदार राऊत भास्कर जाधवांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा

महाराष्ट्राची शान खिलार जनावराचे संवर्धन करा हाच सागरभाऊंचा संदेश घेऊन नातेवाईक परतले. शहरात हौसेदार सागर सिद्ध यांच्या गायीच्या डोहाळे जेवणाची चर्चा रंगली. शेवटी हौसेला मोल नसतं हेच खरं.

loading image
go to top