विधान परिषद आचारसंहितेचा बडगा : हंचिनाळ येथील कार्यक्रम स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषद आचारसंहितेचा बडगा : हंचिनाळ येथील कार्यक्रम स्थगित

विधान परिषद आचारसंहितेचा बडगा : हंचिनाळ येथील कार्यक्रम स्थगित

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे निपाणी तालुक्यात महसूल खात्याकडून घेतला जाणारा ग्रामवास्तव्य कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. हंचिनाळ के. एस. (ता. निपाणी) येथे तालुका पातळीवरील अधिकारयांसह जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत ग्रामवास्तव्य कार्यक्रम घेतला जाणार होता. मात्र विधान परिषद निवडणूक लागल्याने आणि त्याची आचारसंहिता जारी झाल्याने विकासकामांसह सरकारी उदघाटन कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. शिवाय तालुका तहसील कार्यालयातील प्रशासन निवडणूक कार्यात व्यस्त झाले आहे.

तहसीलदार डाॅ. मोहन भस्मे हे आचारसंहिता समितीचे अध्यक्ष आहेत. यामुळे ग्रामवास्तव्य कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसरया शनिवारी तालुक्यातील एका गावात ग्रामवास्तव्य कार्यक्रम घेण्याचा शासकीय उपक्रम आहे. कार्यक्रमात ग्रामस्थांच्या समस्या स्वीकारून समस्यांचे निवारण केले जाते.

यापूर्वी कोरोना संसर्ग व लाॅकडाउनमुळे तालुक्यात ग्रामवास्तव्य उपक्रम खंडीत झाला होता. त्यानंतर बोळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमुळे उपक्रम राबविता आला नाही. मागील महिन्यात शेंडूर येथे तालुका पातळीवरील अधिकारयांच्या उपस्थितीत उपक्रम घेतला होता. मात्र यावेळी ग्रामस्थांनी त्याकडे पाठ फिरवली. शेंडूरनंतर नोव्हेंबर महिन्यात हंचिनाळ के. एस. येथे ग्रामवास्तव्य कार्यक्रमाचे नियोजन होते. तोवरच आचारसंहिता जारी झाली आहे.

"हंचिनाळ के. एस. (ता. निपाणी) येथे ग्रामवास्तव्य उपक्रम घेण्याचे नियोजन होते. कार्यक्रम निश्चित झालेला होता. स्वतः जिल्हाधिकारी उपक्रमास हजर राहणार होते. मात्र आचारसंहिता जारी झाल्याने कार्यक्रम स्थगीत झाला आहे."

-डाॅ. मोहन भस्मे, तहसीलदार, निपाणी

loading image
go to top