बाजरीची माती अन्‌ खायचे वांधे!

सूर्यकांत नेटके 
Sunday, 17 November 2019

‘आमच्या भागात बाजरीचे पारंपरिक पीक. अनेक पिढ्यांपासून बाजरी होते. यंदा मात्र पावसाने बाजरीला मातीमोल केलंय. बाजरी काढायला सुरू केली अन् पाऊस सुरू झाला. पंधरा दिवस सतत पडणाऱ्या पावसाने काढलेल्या बाजरीची माती केली. दर वर्षी चाळीस पोते घरात यायचे. यंदा पोतंभरही बाजरी नाही. साऱ्या बाजरीची माती झाली, आता खायचेच वांधे झाले. नुकसान झाले; पण अजून कृषी विभागासह कोणत्याही विभागाचे अधिकारी फिरकले नाहीत,’

नजीक बाभूळगाव (जि. नगर) - ‘आमच्या भागात बाजरीचे पारंपरिक पीक. अनेक पिढ्यांपासून बाजरी होते. यंदा मात्र पावसाने बाजरीला मातीमोल केलंय. बाजरी काढायला सुरू केली अन् पाऊस सुरू झाला. पंधरा दिवस सतत पडणाऱ्या पावसाने काढलेल्या बाजरीची माती केली. दर वर्षी चाळीस पोते घरात यायचे. यंदा पोतंभरही बाजरी नाही. साऱ्या बाजरीची माती झाली, आता खायचेच वांधे झाले. नुकसान झाले; पण अजून कृषी विभागासह कोणत्याही विभागाचे अधिकारी फिरकले नाहीत,’’ नजीक बाभूळगाव (ता. शेवगाव) चे सोमनाथ घनवट, देवीलाल घनवट हतबल होऊन बाजरीच्या झालेल्या नुकसानीची व्यथा मांडत होते. 

कोरडवाहू पीक म्हणून ओळख असलेल्या खरीप बाजरीचे पीक प्रामुख्याने राज्यात सिंचनाचा अभाव असलेल्या भागात घेतले जाते. यंदा राज्यात सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस झाला नाही आणि नंतरच्या काळातही पावसाने ओढ दिल्याने बाजरीची सरासरी क्षेत्राच्या ७८ टक्के म्हणजे ८ लाख १० हजार ४६७ क्षेत्रापैकी ६ लाख ३३ हजार ९२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

सर्वाधिक बाजरीचे पुणे विभागात क्षेत्र आहे. त्या पाठोपाठ मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूर, नाशिक विभागात बाजरी घेतली जाते. राज्यात सर्वाधिक नगर जिल्ह्यामध्ये यंदा १ लाख ५४ क्षेत्रावर बाजरी घेतली. दिवाळीच्या काळात खरीप बाजरी काढणीला येते. यंदा मात्र मॉन्सुनोत्तर पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. काही ठिकाणी बाजरी काढली होती, तर काही ठिकाणी काढणी चालू असताना पाऊस सुरु झाला. सतत पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पाऊस सुरू राहिल्याने काढलेल्या व उभ्या असलेल्याही जवळपास सर्वच कणसांना कोंब फुटले. नगर, मराठवाडा, विदर्भ, नाशिक भागात बाजरीचा दररोजच्या खाण्यात वापर होतो. अनेक कुटुंबांची भूक बाजरीवर अवलंबून आहे. ‘सरमाडाचा’ जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर होते. यंदा मात्र पूर्णतः बाजरीची ताटे सडल्याने चाराही खाण्याजोगा राहिला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काढलेली बाजरी कणसासह शेताच्या बांधावर 
टाकली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajari Agriculture loss by rain