दिवसा नोकरी, रात्री द्राक्ष शेतकऱ्यांना पाच वर्षापासून 'हे' करताहेत मोफत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

वायफळेच्या बी. जे. यांचा पाच वर्षांपासून मोफत उपक्रम

विसापूर (सांगली) : अडीचशेवर व्याख्यानांतून तब्बल ३५०० शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीचे मोफत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम वायफळे (ता. तासगाव) येथील बाळासाहेब जगन्नाथ पाटील यांनी राबवला आहे. गेली पाच वर्षे ते हा उपक्रम राबवत आहेत. 

श्री. पाटील सकाळी नऊ ते पाच कृषी विभागातील नोकरी सांभाळत महिन्यातील किमान वीस दिवस ते रात्री व्याख्याने देतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांना झाला आहे. हे शेतकरी निर्यातक्षम द्राक्षे तयार करून परदेशात पाठवत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सांभाळून उत्तम निर्यातक्षम द्राक्षे तयार झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागला आहे.

बाळासाहेब जगन्नाथ ऊर्फ बी. जे. पाटील तासगावला कृषी विभागात कृषी सहाय्यक आहेत. शेतीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व सेवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्या लागतातच. तो त्यांच्या सेवेचा एक भाग आहे. मात्र सकाळी नऊ ते पाच अशी नोकरी करून पुन्हा रात्री गावात द्राक्ष शेती कशी करायची याचे मोफत मार्गदर्शन ते विनामूल्य देतात. विशेषतः सेंद्रिय आणि जीवाश्‍म खतांचा वापर करून रसायनांचा कमी वापर करून शेती विषमुक्त करण्याकडे त्यांचा कल आहे. त्याचे ज्ञान ते शेतकऱ्यांना देतात. एप्रिल छाटणी ते द्राक्षे संपेपर्यंत त्यांचा हा एक कलमी कार्यक्रम असतो.

हेही वाचा- दुचाकी दुरुस्तीतीतून करीअरची इंजिन मजबूत: कोल्हापूरच्या शिवानीचे आत्मनिर्भतेकडे एक पाऊल -

 द्राक्षाची काडी तयार करण्यापासून ते निर्यातक्षम द्राक्ष करण्याबरोबरच पाठवण्यासाठी काय तंत्रज्ञान व टीप्स शेतकऱ्यांना अपेक्षित व आवश्‍यक आहे याची माहिती ते देतात.त्यांच्या व्याख्यानांमुळे द्राक्ष बागायतदारांना अचूक माहिती मिळते. त्यामुळे जत, मणेराजुरी, निमणी, पळशी, मिरज तालुक्‍यातील बेळंकी, सोनी अशा अनेक गावांत शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहेत. या शेतकऱ्यांचा  पाटील यांना व्याख्यानासाठी हमखास निरोप येतो. 

लॉकडाउनमध्ये ऑनलाईन 
लॉकडाउन काळातही त्यांनी शेतकऱ्यांना ऑनलाइन लेक्‍चरद्‌वारे मार्गदर्शन केले आहे. व्याख्यानांमुळे असंख्य तरुण द्राक्षबागेच्या शेतीत उतरलेत. उत्कृष्ट वाण असणारी निर्यातक्षम द्राक्षे करण्यासाठी या तरुणांत इर्षा लागली आहे. परिणामी नोकरीमागे न लागता ग्रामीण युवक आज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb patil visapur positive story in sangli