बालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतील ग्रंथांचे पूजन करून २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरवात झाली. ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर व सातारा परिसरातील १५ ते २० शाळांतील विद्यार्थी महापुरुष, समाजसेवकांचा वेश परिधान करून सहभागी झाले होते. 

अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्थेचे हे बालकुमार संमेलन राज्य मराठी विकास संस्था आणि भिलार ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पार पडत आहे.

जिल्हा परिषदेच्या येथील केंद्र शाळेतून ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. शाळेतील विद्यार्थिनी गौरी सुतार हिच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पूजा करण्यात आली.

या वेळी शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, संमेलनाचे निमंत्रक प्रवीण भिलारे, अखिल भारतीय मराठी साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीत बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, सहकार्यवाह सुनील महाजन, समन्वयक शिरीष चिटणीस, राज्यभरातून आलेले बालसाहित्यिक, विचारवंत, रसिक, भिलार ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रंथदिंडीच्या प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशातील पथक, त्यानंतर ढोल- ताशा पथक, लेझीम पथक, पारंपरिक वेश परिधान केलेल्या मुलींचे पथक, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करणारे पथक, कलश व तुळशी वृंदावन डोक्‍यावर घेतलेल्या मुलींचे पथक अशा विविध पथकांच्या माध्यमातून अक्षरशः भिलारकरांना संस्कृतीचे दर्शन घडले. ग्रंथदिंडीच्या मार्गावर स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा रसिकांचे स्वागत करणाऱ्या कमानी, फलेक्‍स होते. ठिकठिकाणी संमेलनातील कार्यक्रमांची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले होते. पालखीत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथांचा समावेश होता. भिलारचे ग्रामदैवत जननीमाता मंदिराशेजारील संमेलनाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ग्रंथदिंडीचा समारोप झाला. त्यानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

सावरकर, गदिमा, विवेकानंदांचे आकर्षण 
ग्रंथदिंडीत शाळकरी मुले विनायक दामोदर सावरकर, गदिमा आणि स्वामी विवेकानंदांची वेशभूषा करून सहभागी झाले होते. त्यामुळे ही मुले रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरली. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थित गर्दी करीत होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माय मराठीच्या नावाच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. अतिशय प्रसन्न आणि उत्साही वातावरणात ही ग्रंथदिंडी पार पडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balkumar Sahitya Sammelan Granthdindi