बॅंकेच्या पिग्मी एजंटाकडूनच यशवंत बँकेत लुट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

एक नजर

- यशवंत सहकारी बॅंकेच्या आपटेनगर शाखेतील ६२ हजारांच्या लुटीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश.

- बॅंकेच्या पिग्मी एजंटनेच साथीदाराच्या मदतीने केले कृत्य. 

- लुटीची रक्कम जप्त.

- पिग्मी एजंट विजय रामचंद्र गौड (वय ३६, रा. निकम गल्ली, कळंबा), राजू नेताजी सातपुते (वय २८, रा. तुरबत गल्ली, कळंबा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे. 

-  साथीदार अक्षय ऊर्फ आकाश दाभाडे याचा शोध सुरू. 

कोल्हापूर - यशवंत सहकारी बॅंकेच्या आपटेनगर शाखेतील ६२ हजारांच्या लुटीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आज यश मिळाले. बॅंकेच्या पिग्मी एजंटनेच साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून लुटीची रक्कम जप्त केली.

दरम्‍यान, तपासात कळंबा परिसरातून पाच वर्षांपासून गायब असणारा भैरवप्रसाद ऊर्फ सुनील बाळासाहेब पाटील (वय २८, मूळ रा. कणेरीवाडी) याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पैशाच्या देवघेवीतून गौड व त्याच्या दोघा साथीदारांनी पाटील याचा भोसकून खून केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पिग्मी एजंट विजय रामचंद्र गौड (वय ३६, रा. निकम गल्ली, कळंबा), राजू नेताजी सातपुते (वय २८, रा. तुरबत गल्ली, कळंबा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अक्षय ऊर्फ आकाश दाभाडे याचा शोध सुरू आहे. 
यशवंत बॅंकेची बालिंगा-आपटेनगर शाखेतील ६२ हजार ११० रुपयांची रोकड ३० मे रोजी दोघा लुटारूंनी भरदिवसा लुटली होती. पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी एकाने हेल्मेट घातले होते. दुसऱ्याने डोक्‍याला टोपी बांधली होती. त्या दोघांनी बॅंकेचे लिपिक दर्शन निगडे यांना पिस्तूल व सुऱ्याचा धाक दाखवून बॅंकेचे ड्रॉव्हर फोडून रोकड पळवली होती.  

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली होती. त्यानंतर लुटारूंचा शोध करवीर पोलिसासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरीत्या सुरू केला. 

लुटीचा असा लागला छडा...
बॅंकेची लूट करणाऱ्या एका लुटारूने हेल्मेट घातले होते. दुसऱ्याने अंगात ग्रे रंगाचे जॅकेट व डोक्‍याला टोपी घातली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी कुमार पोतदार यांना खबऱ्याने हे काम संशयित राजू सातपुते व विजय गौड यांचे असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार पोतदार, गुलाब चौगले, सहायक फौजदार शिवाजी जामदार, कृष्णात पिंगळे, सोमराज पाटील यांच्या पथकाने संशयित राजू सातपुते याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही लूट संशयित विजय गौडच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानंतर गौड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानेही या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्या दोघांकडून वाटून घेतलेले प्रत्येकी ३० हजार अशी ६० हजारांची रोकडसह गुन्ह्यात वापरलेली मोपेडही जप्त केली. 

पिग्मी एजंटाने अशी लुटली बॅंक
संशयित गौड याचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. दूध विक्रीचे पैसे तो बॅंकेत जमा करतो. तसेच तो यशवंत बॅंकेतही पिग्मी एजंट म्हणूनही काम करतो. त्याचा भरणा करण्यासाठी तो बॅंकेत जातो. त्यामुळे बॅंकेत किती कर्मचारी आहेत, बॅंकेत कोणत्यावेळी गर्दी असते याची इत्यंभूत माहिती गौड याला आहे. त्याचा साथीदार संशयित राजू सातपुतेचा पेंटिंगचा व्यवसाय आहे. त्या दोघांनाही पैशाची चणचण होती. यातूनच गौडने दोनदा बॅंक लुटीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला होता. अखेरीस ३० मे रोजी दुपारी त्या दोघांनी भरदिवसा ही बॅंक लुटली. त्यानंतर पैसे निम्मे-निम्मे वाटून घेतल्याची कबुली दोघा संशयितांनी दिली. 

हत्यारांचा शोध सुरू
संशयित गौड याच्यावर कळंबा येथील व्यापाऱ्याची २००९ मध्ये लूट केल्याचा गुन्हाही यापूर्वी दाखल आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल व सुरा संशयितांनी कोठे लपवून ठेवला आहे? याचाही तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

पाच वर्षांनंतर तरुणाच्या खुनाचा छडा...
कळंबा परिसरातील भैरवप्रसाद ऊर्फ सुनील पाटील हा २ जानेवारी २०१४ मध्ये साई मंदिराजवळ जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घरी आलाच नाही. त्यानंतर घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. अखेरीस त्याची पत्नी प्रीती पाटील (रा. कणेरीवाडी, करवीर) यांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार करवीर पोलिस ठाण्यात दिली. मात्र त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागला नव्हता. लूट प्रकरणातील संशयित राजू सातपुते हा भैरवप्रसाद यांच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिस कर्मचारी कुमार पोतदार यांना मिळाली. त्यांनी हा प्रकार पोलिस निरीक्षक सावंत यांना सांगितला. त्याला पोलिसांनी विश्‍वासात घेतले. तुझ्याकडून आणखी एक गुन्हा उघडकीस येणार आहे, त्याची आताच कबुली दिल्यास एकाचवेळी कारवाईची प्रक्रिया संपून जाईल, असे सांगितले. त्याला तो बळी पडला. त्याने भैरवप्रसाद याचा खून दोघा साथीदारांच्या मदतीने केल्याची धक्कादायक कबुली दिली.

राजू सातपुते हा भैरवप्रसाद याच्या संपर्कात होता. त्यांच्यात पैशाचा व्यवहार झाला होता. मात्र घेतलेले पैसे राजू वेळेत परत देत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते. याच वादातून भैरवप्रसाद आपला काटा काढेल, असा संशय राजूला आला होता. त्यापूर्वीच आपणच भैरवप्रसाद याचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. त्याने संशयित विजय गौड व अक्षय ऊर्फ आकाश दाभाडे या साथीदारांच्या मदतीने भैरवप्रसाद याचा २ ते ३ जानेवारी २०१४ ला भोसकून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली पोलिसांना दिली. अद्याप दाभाडे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मृतदेहाची कोठे विल्हेवाट लावली ते ठिकाण सांगताना तो टाळाटाळ करत आहे. मात्र लवकरच त्याचा छडा लावला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank Pigmy Agent looted Yashwant Bank