तळघरे तुडुंब : सांगलीत शहर नियोजनाचा अभाव, अहोरात्र उपसा सुरू

बलराज पवार
Saturday, 24 October 2020

परतीच्या पावसाच्या दणक्‍याने सांगली  शहरातील तळघरे तुडुंब झाली असून, गतवर्षीच्या महापुरातही जे शक्‍य झाले नाही अशा विश्रामबाग, कुपवाड आणि मिरजेतील अनेक इमारतींची तळघरे सध्या पाण्यात आहेत.

सांगली : परतीच्या पावसाच्या दणक्‍याने शहरातील तळघरे तुडुंब झाली असून, गतवर्षीच्या महापुरातही जे शक्‍य झाले नाही अशा विश्रामबाग, कुपवाड आणि मिरजेतील अनेक इमारतींची तळघरे सध्या पाण्यात आहेत. या पाण्याच्या उपशासाठी अहोरात्र विद्युत-डिझेल पंप सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात असे सार्वत्रिक चित्र प्रथमच दिसत आहे. सणासुदीच्या तोंडावर शहरातील व्यापारी सध्या पाणी उपशाच्या कामात व्यस्त आहेत. 

शहरातील अपार्टमेंट, व्यापारी संकुलांची तळघरांची अक्षरक्षः तळी झाली आहेत. अनेक ठिकाणी गटारांचे पाणीही घुसले असून, दुर्गंधीने सारे त्रस्त आहेत. खुल्या खासगी भूखंडांमधील पाणी आता पंधरा दिवस ते महिनाभर आटेल असे वाटत नाही. जागोजागी ओढ्याप्रमाणे गटारे वाहत असून त्यातून कचरा, टाकाऊ वस्तूंचे ढीग वाहत आहेत. गटारांमध्ये फेकलेले हे सारे पुन्हा जागोजागी साचले आहे. विश्रामबागच्या अनेक उपनगरांत प्लास्टिकचे कचऱ्याचे उभे ढीग शहराची दैना दाखवत आहेत. 
यंदा महापुरातून वाचल्याचा आनंद परतीच्या पावसाने टिकू दिला नाही. नागरिक आणि व्यापाऱ्यांना पावसाने नकोसे करून सोडले आहे. आधीच रस्त्यांची दुर्दशा आणि त्यात भर आता तळघरांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याने उरले सुरले रस्तेही धुवून जात आहेत. 

अनेक तळघरांमध्ये गेल्या काही वर्षांत पार्किंगऐवजी गाळे काढून विक्री झाली आहे. त्यात मोठे अर्थकारण असल्याने घेणारे आणि देणारे असे सारेच राजी असल्याने अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याची वाईट फळे सर्वांनाच भोगावी लागत आहेत. 

पंपवाल्यांना व्यवसाय तेजीत 
शहरातील कोल्हापूर रोड, हरभट रोड, कॉलेज कॉर्नर, विश्रामबागमधील स्फूर्ती चौक, हसनी आश्रम रोड, आमराई रोड परिसरातील तळघरे पाण्यात असून पंप भाड्याने घेऊन तिथून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाऊस थांबला तरी, या पाण्याचे लोंढे रस्त्यावर वाहताना दिसत आहेत. यामुळे पंपवाल्यांचा व्यवसाय तेजीत आहे. 

तोंड दाबून बुक्‍यांचा मार... 
अनेक व्यापाऱ्यांनी पार्किंग जागेची गोदामे केली असल्याने त्याबाबत तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. नुकसान मोठे असले तरी आता बोलायची पंचाईत आहे. 

जीमची दारे पावसाने रोखली 
शहरातील बहुतेक व्यायामशाळा तळघरातच आहेत. अगदी कुपवाड, मिरजेतील अनेक जीम सध्या पाण्यात आहेत. कोरोनाने लावलेले टाळे आता दसऱ्यापासून निघणार होते, मात्र त्याआधीच आता पावसामुळे पुढचे आठ- पंधरा दिवस तरी टाळे कायम राहणार आहे. व्यायाम साधनांचे नुकसान झाले आहे, ते वेगळेच. 

भूजल पातळी सहा फुटांवर 
शहरातील गावभागापासून विश्रामबागपर्यंतची सध्या भूजल पातळी सहा ते दहा फुटांवर आली आहे. तळघरांची खोली जमिनीपासून सरासरी दहा फुटांपर्यंत आहे. त्यामुळे जागोजागच्या तळघरांमध्ये सध्या पाझर फुटले आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Basement Full of Water: Lack of city planning in Sangli, day and night pumping continues