सांगलीतील काळी खण सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत; प्रस्ताव देऊनही प्रकल्प रखडला

बलराज पवार
Wednesday, 30 September 2020

सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काळ्या खणीचे सुशोभीकरणाचे घोडे अजूनही पेंड खात आहे. शेरीनाल्याप्रमाणेच निवडणुकीचा मुद्दा बनलेली ही खण अनेक वेळा चर्चा होऊनही सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

सांगली : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काळ्या खणीचे सुशोभीकरणाचे घोडे अजूनही पेंड खात आहे. शेरीनाल्याप्रमाणेच निवडणुकीचा मुद्दा बनलेली ही खण अनेक वेळा चर्चा होऊनही सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या खणीला लागून असलेल्या रस्त्यावर पहिल्या टप्प्यात वॉकिंग ट्रॅक, पार्क असा पर्यटन स्थळाचा आराखडा तयार आहे; मात्र या कामालाही कोरोनामुळे मुहूर्त मिळालेला नाही.

शहरातील पुष्पराज चौकाकडून आपटा पोलिस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळी खण हा मोठा तलाव आहे. कोल्हापूरच्या रंकाळ्याप्रमाणे येथेही सुशोभीकरण करून तेथे एक चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. त्याबाबतचे प्रस्तावही तयार झाले; पण प्रत्येक वेळी निवडणुकीच्या मुद्यासारखी चर्चा होते आणि विरून जाते, असेच घडत आहे. 

कारंजे, बोटिंगची स्वप्ने 
काळ्या खणीत कारंजे बसवणे, बोटिंग सुरू करणे, त्यातच लेसर शो करणे, अशी अनेक मनोहारी स्वप्ने यापूर्वी दाखवली गेली. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च होणार आहे, त्याचा प्रस्ताव तयार आहे, आराखडाही बनवला आहे... अशा चर्चा झाल्या. यासाठी केंद्र शासनाकडे सुमारे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगण्यात येते. केंद्राच्या तलाव संवर्धन योजनेची मंजुरी घेण्यात येणार असे समजते; पण जोवर प्रत्यक्षात काम सुरू होत नाही, तोवर काळ्या खणीचे सुशोभीकरण हे स्वप्नच राहणार आहे. 

कसा आहे आराखडा ? 
सध्या तरी पहिल्या टप्प्यात काळ्या खणीवर कॅंटिलिव्हर (बाल्कनी) उभारण्यात येणार आहे. एका बाजूस वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी बेंच, छोटासा बगीचा करण्यात येणार आहे. त्याला लागूनच खणीवर ही बाल्कनी असणार आहे. अशी बाल्कनी दोन-तीन ठिकाणी असेल. त्यामुळे सकाळ-सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी, निवांत बसण्यासाठी, विरंगुळ्यासाठीचे स्थळ बनेल. त्याचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे किमान हे काम तरी लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. 

प्रयत्न सुरू आहेत
शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली काळी खण सुशोभीत केल्यास ते चांगले पर्यटन स्थळ होणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात तेथे वॉकिंग ट्रॅक, बगीचा करण्यात येणार आहे. त्यानंतर खणीत कारंजा, बोटिंग आदी सुविधाही सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास नागरिकांसाठी एक चांगले विरंगुळ्याचे ठिकाण तयार होईल. 
- सुधीर गाडगीळ, आमदार

जागेच्या वादात हा प्रकल्प रखडला
मी महापौर असताना पर्यावरण विभागाच्या तलाव संवर्धन योजनेत 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता. यामध्ये बोटिंग, कारंजे, झुलता पूल, विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन होते. मी स्वत: दिल्लीला जाऊन प्रस्ताव सादर केला. त्याची पाहणी करण्यासाठी दिल्लीची समितीही येऊन गेली. 2008 पर्यंत मी त्याचा पाठपुरावा करत होतो; पण नंतर जागेच्या वादात हा प्रकल्प रखडला. सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्यास एक चांगले पर्यटन स्थळ सांगलीसाठी तयार होईल. 
सुरेश पाटील, माजी महापौर. 

कोरोनानंतर पालकमंत्री, महासभेसमोर सादरीकरण

काळ्या खणीच्या सुशोभीकरणाचा प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार आहे. वॉकिंग ट्रॅक, बगीचा, बसण्याचे पॉईंट असे यामध्ये नियोजन आहे; मात्र सध्या कोरोनाची पार्श्‍वभूमी आणि निधी खर्चाला शासनाचे निर्बंध यामुळे काम थांबले आहे. कोरोनानंतर या प्रकल्पाचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच महासभेसमोर सादरीकरण करण्यात येईल आणि नंतर काम सुरू करण्यात येईल. 
- नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिका. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beautification Awaiting of Kali Khan in Sangli; Despite the proposal, the project stalled