यामुळे भाकरीच्या तयारीला लागल्या महिला 

सुस्मिता वडतीले
Monday, 23 December 2019

नववर्षाच्या धामधुमीपाठोपाठ मकर संक्रांत हा पहिला सण येतो. या दिवसांत भाजीपाला आणि बाजरीची भाकरी सर्वांनाच खाण्यास आवडते. महाराष्ट्रात मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी दिवशी पाच भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी करतात.

सोलापूर : मकर संक्रांत म्हटले की सर्वांना डोळ्यासमोर येते ती कडक बाजरीची भाकरी. खेंगाट भाजी, शेंगाचटणीसोबत खाण्यास बाजरीची भाकरी सर्वांनाच आवडते. दोन महिन्यांपासून बचत गटातील महिलांनी बाजरीची भाकरी बनवण्यास सुरवात केली आहे. दुकानाच्या तुलनेत बचत गटातील दर कमी असल्याने भाकरी खरेदी करताना नागरिकांकडून बचत गटांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 

हेही वाचा : अन्‌ वडिलांचे स्वप मुलाने साकार केले 
भोगीला भाजीसोबत बाजरीची भाकरी 

नववर्षाच्या धामधुमीपाठोपाठ मकर संक्रांत हा पहिला सण येतो. या दिवसांत भाजीपाला आणि बाजरीची भाकरी सर्वांनाच खाण्यास आवडते. महाराष्ट्रात मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी दिवशी पाच भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी करतात. बाजरीची भाकरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे अधिक फायदेशीर असते. बाजरी ही बलकारक, उष्ण, कफनाशक असते. त्यामुळे भोगीला भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवतात. बचत गटांच्या निर्मितीतून महिलांना मोठा आर्थिक आधार निर्माण झाला आहे. संक्रांतकरिता अगोदर भाकरी तयार होण्यासाठी दिवसभर बचत गटातील महिला व्यस्त आहेत. सध्या होलसेल दरात एक बाजरीची भाकरी चार रुपयांना विकत आहेत. या उद्योगासाठी महिलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यासाठी मोठी साथ मिळते. संक्रांतकरिता भाकरी बनविण्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू असते. संक्रांतकरिता 15 दिवस आधीच भाकरीची ऑर्डर देण्यात येते. सोलापूर शहरातील बाजरीच्या भाकरीला सोलापूरसह, उदगीर, बीड, पुणे, उमरगा, बार्शी, पंढरपूर अशा अनेक ठिकाणी मागणी आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना चांगला रोजगार मिळत असून दुकानाच्या तुलनेत दर कमी असल्याने भाकरी घेण्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहेत. 

हेही वाचा : हे आधार कोणाचे? 
महिला म्हणतात...
 
मी पाच ते सहा वर्षांपासून संक्रांतकरिता बाजरीची भाकरी बनवत आहे. आमच्या बचत गटाकडे या दिवसात भाकरीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. 
- यमुना मोटे, ढाणेश्‍वरी महिला बचत गट 

आमचा बचत गट हा अनेक वर्षांपासून बाजरीची भाकरी बनवत आहे. संक्रांतकरिता दोन महिने आधी आम्ही भाकरी बनवत असतो. 
- विद्याश्री करकंब, ढाणेश्‍वरी महिला बचत गट 

मकर संक्रांत सणात बाजरीच्या भाकरीला खूप मान आहे. यादिवशी भाकरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमच्या येथे भरपूर प्रमाणात भाकरी बनवतात. 
- इरावती शहापुरे, मायक्का महिला बचत गट 
 
मी आणि माझ्या बचत गटातील महिला मिळून कडक बाजरीची भाकरी बनवतो. या भाकरीला सोलापूरसह अनेक गावांतून मागणी वाढली आहे. त्यासाठी 10 दिवसांपासून बुकिंग सुरू झाले आहे. 
- लक्ष्मी केल्लुरे, मायक्का महिला बचत गट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beginning to make millet bread from the women of Self Help Group