अन्‌ वडिलांचे स्वप्न मुलाने साकार केले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The dream child has come true

नगरचा बॅडमिंटन खेळाडू यश शाह याची आंध्र प्रदेशात 24 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय (19 वर्षांखालील वयोगट) बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली.

अन्‌ वडिलांचे स्वप्न मुलाने साकार केले

नगर ः नगरमध्ये 80च्या दशकात एक खेळाडू राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा खेळला; पण अपेक्षेप्रमाणे त्याला त्यात यश मिळाले नाही. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्याने त्याच्या मुलाचेच नाव यश ठेवले. यशला पतंग व क्रिकेटच्या वेडातून बाहेर काढत बॅडमिंटनचे सुरवातीचे धडे दिले. त्याला बॅडमिंटनची आवड निर्माण झाली. त्या वेडाने त्याला सलग चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेत स्थान दिले. वडिलांचे राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे अधुरे स्वप्न या यशने पूर्ण केले. ही आहे नगरमधील छायाचित्रकार अनिल शहा व त्यांचा मुलगा यश याच्या बॅडमिंटन संघर्षाची कथा. 


नगरचा बॅडमिंटन खेळाडू यश शाह याची आंध्र प्रदेशात 24 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय (19 वर्षांखालील वयोगट) बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली. यशला निवडीचे पत्र महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव एस. ए. शेट्टी यांनी दिले आहे. महाराष्ट्राच्या संघासमवेत प्रशिक्षक किरण मकोडे, व्यवस्थापक मिलिंद देशमुख हेही आहेत. 

हेही वाचा ः हे आधार कुणाचे ?   

अनिल शहा त्यांनी यशला सुरवातीला कॉलनीत व गच्चीवर बॅडमिंटनचे प्राथमिक धडे देण्यास सुरवात केली. पाहता पाहता त्याला बॅडमिंटनचा छंदच जडला. त्याला वडिलांनी वाडिया पार्क येथे प्राथमिक प्रशिक्षणासाठी विशाल गर्जे व उदय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऍकॅडमीत घातले. त्यानंतर शांतिलालजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनच्या मॅक्‍सिमस ऍकॅडमीत घालण्यात आले. त्याने नगरमधील 10 ते 19 वयोगटातील सर्व स्पर्धांतील जेतेपद त्याने मिळविले. मात्र नंतर आई मयूरीशी चर्चा होऊन पुण्याला प्रशिक्षणासाठी पाठविले. तो 17 वर्षांखालील वयोगटाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत एकेरीचा विजेता झाला. त्यानंतर त्याने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांत चार वेळा दुहेरीचे विजेतेपद व 19 वर्षे वयोगटात एकेरीचेही विजेतेपद मिळविले. गोवा येथे नुकत्याच झालेल्या पश्‍चिम विभागीय स्पर्धेत यशची निवड झाली. 

हेही वाचा ः नाताळगाणी वाढवितात ख्रिसमसचा उत्साह

यश हा अहमदनगर महाविद्यालयामध्ये एस.वाय. बी.बी.ए.चे शिक्षण घेत आहे. तो पुणे येथे वरुण खानविलकर यांच्या पी. वाय. हिंदू जिमखाना येथे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे. 

आईच त्याची व्यवस्थापक 
यशचे वडील छायाचित्रकार आहेत. व्यावसायिक व्यापामुळे त्यांना विविध स्पर्धांत यशबरोबर जाणे शक्‍य होत नसे. त्यामुळे त्याच्या आई मयूरी शहा यांनी त्याची जबाबदारी सांभाळली. आता तो, "मोठा झाल्याने माझ्याबरोबर येऊ नकोस,' असे सांगतो. 

यशचा हट्ट 
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने यशची इंडोनेशिया येथे 21 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड केली होती; परंतु निवड झालेल्या चार खेळाडूंपैकी एका खेळाडूने जाण्यास नकार दिला. यशने मात्र इंडोनेशियाला जाण्याचा हट्टच धरला. त्याच्या या हट्टाला नगरचे प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया व अमेरिकेतील यशचे काका सुनील शहा यांनी साथ दिली. त्यामुळे यश व त्याचा साथीदार खेळाडू हर्शल जाधव हे दोघेही एक महिना इंडोनेशियामध्ये प्रशिक्षण घेऊन आले. 
 

loading image
go to top