
उपकरात वाढ झाल्याने निर्णय ः असोसिएशन सचीवांना देणार निवेदन
बेळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) बाजार उपकर 0.35 टक्यावरून 1 टक्यापर्यंत वाढविल्याच्या निर्णयामुळे बेळगाव एपीएमसीतील सर्व व्यवहार सोमवारी (ता.21) बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल आणू नये तसेच मालाची पट्टी घेण्यासाठीही येऊ नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे. यासंबंधी रताळी, बटाटा, गुळ मार्केट असोशिएशनकडून एपीएमसी सचीवांना निवेदन देण्यात येणार आहे. कांदा मार्केटचे व्यापारी देखील बंदमध्ये सहभागी असणार आहेत.
यासंबंधी रविवारी (ता.22) बटाटा, रताळी, गुळ मार्केट असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. एपीएमसी व्यापाऱ्यांकडून शेकडा कर आकारणी करते. यापूर्वी हा कर 1 रुपये होता. याला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा कर 0.35 टकके करण्यात आला होता. मात्र, पुन्हा हा कर 1 रुपये करण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. यासंबंधी कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजने (केसीसीआय) एपीएमसी बंद पुकारला आहे. त्याला बेळगाव एपीएमसीतील असोसिएशन व व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.
हेही वाचा- भिरवंडेच्या पार्थ सावंतचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरव -
बेळगावातील एपीएमसीत रोज कोट्यावधींची उलाढाल होते. सध्या रताळी व बटाटा मार्केट तेजीत सुरु आहे. मात्र, उपकर वाढविल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पूर्वीप्रमाणेच 0.35 टक्के उपकराची आकारणी केली जावी, अशी मागणीही केली जाणार आहे. प्रत्येक सोमवारी एपीएमसीतील व्यवहार कमी असतात. मात्र, शेतकरी मालाची पट्टी व पैसे घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडे येतात. सोमवारी व्यापाऱ्यांनी कुलूपबंद आंदोलन पुकारल्यामुळे शेतकऱ्यांनी एपीएमसीत येऊ नये, असे आवाहन केले आहे. बैठकीला बटाटा, रताळी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरुचे, उपाध्यक्ष चेतन खांडेकर, सचीव माणिक होनगेकर, विनायक होनगेकर, नरसिंह पाटील, राजू जाधव, राहूल होनगेकर, विक्रमसिंह कदम-पाटील, सुरेश जाधव, मोहन कुट्रे आदी उपस्थि होते.
संपादन- अर्चना बनगे