Accident : अथणीत कॉलेज बसला भीषण अपघात; दोन्ही चालक जागीच ठार तर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Athani Collage Bus Accident Several Student Injured

Accident : अथणीत कॉलेज बसला भीषण अपघात; दोन्ही चालक जागीच ठार तर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी

अथणी, ता. २० : अथणी येथे कॉलेज बस-टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. मिरज-विजापूर रस्त्यावर शनिवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यात वीस विद्यार्थिनी जखमी असून पाच गंभीर जखमींना मिरज येथे हलविण्यात आले आहे. रघुनाथ औताडे (वय 40, रा. कोडगनूर, ता. अथणी) असे मयत बस चालकाचे तर मलिकसाहेब मुजावर (वय 23, कलमडी ता. तिकोटा, जि. बागलकोट) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. (Belgaum Athani Collage Bus Accident Several Student Injured)

याबाबत अधिक माहिती अशी, मिरज-विजापूर रस्त्यावर आज सकाळी टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक झाली. अथणीपासून तीन किलो मीटरवर बनजवाड हायस्कूल व कॉलेज आहे. तेथे विद्यार्थिनींना घेऊन निघालेल्या बसला हा अपघात झाला. मिरजहून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरून चाललेल्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

यामध्ये दोन्ही चालक जागीच ठार झाले. बसमधून 70 विद्यार्थिनी प्रवास करत होत्या. त्यातील वीस जणी जखमी झाल्या आहेत. पाच विद्यार्थिनी गंभीर असल्याने उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. अपघात स्थळी गर्दी झाली असून मदत कार्य सुरू आहे. बसमधून विद्यार्थिनी प्रवास करत असल्याने त्यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या मुली सुरक्षित असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. मात्र दोन्ही चालक ठार झाल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत होती.