बेळगाव : दहावी परीक्षेसाठी CCTV बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या परीक्षेवेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक

बेळगाव : दहावी परीक्षेसाठी CCTV बंधनकारक

बेळगाव : दहावीच्या परीक्षेवेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केल्यामुळे ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्या शाळांना तातडीने कॅमेरे बसवून घेण्यासाठी धडपड करावी लागत आहे.दहावीच्या परीक्षेला सोमवारपासून (ता. २८) सुरुवात होणार आहे. त्यामुळे परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर घेऊन ठेपल्यामुळे शिक्षण खात्याकडून परीक्षेची सर्व तयारी केली जात आहे. गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पर्यवेक्षकांची सातत्याने बैठक घेऊन त्यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या जात आहेत.

तसेच दहावी परीक्षेवेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, याकरिता सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर ज्या शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, त्या कॅमेऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्यासाठी शिक्षकांना धावपळ करावी लागत आहे.

सोशल मीडियाचा वापर वाढल्याने परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, याकरिता शाळेचा आवार आणि इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली आहे.मात्र गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाचे संकट निर्माण झाल्यामुळे परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची सक्ती करण्यात आली नव्हती. मात्र यावेळी सीसीटीव्हीची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा पारदर्शकरित्या पार पाडण्यास मदत होणार आहे, असे मत शिक्षण खात्यातून व्यक्त होत आहे.

२८ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत परीक्षा होणार आहेत. या वेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदाही परीक्षा केंद्रांवर कोरोना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. तसेच एका वर्गात वीस विद्यार्थ्यांना बसविण्याची सूचना केली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर शनिवारी व रविवारी विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक घातले जाणार आहेत.

कॅमेऱ्यासाठी राखीव निधी वापरा

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील १३९ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. यापैकी अनेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र काही शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. अशा शाळांना आवार तसेच प्रवेशपत्रिका जेथे खुली करतात, अशा खोलीत कॅमेरे बसवून घेण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे.

परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सक्ती करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्या शाळांनी रविवारपर्यंत सीसीटीव्ही बसवून घेऊन त्याची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. शिक्षण खात्यातर्फे परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

- एन. आर. पाटील, समन्वयक अधिकारी

Web Title: Belgaum Cctv Mandatory 10th Exam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top