
बेळगाव : भाजपचा गड काँग्रेस भेदणार?
बेळगाव: एखाद्या प्रकरणावरुन बेळगावात ठिणगी पडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. ४० टक्के कमिशनच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापले असून यात कंत्राटदार संतोष पाटील यांचा बळी गेला. त्याचे जोरदार पडसाद जिल्ह्यासह राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे.
बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यात ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात, त्या पक्षाची राज्यात सत्ता येते, असे मानण्यात येते. यामुळे भाजप आणि काँग्रेसने आतापासूनच जोर लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच उत्तर कर्नाटकातील प्रत्येक घडामोडींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, बेळगावमधील ठेकेदाराने उडपीत आत्महत्या केल्यानंतर ४० टक्के कमिशनच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. यातून ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा तसेच राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
तर या विषयावर काँग्रेस अधिक आक्रमक झाला आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची सभा मंगळवारी (ता. १२) बेळगावात झाली. आगामी विधान परिषद तसेच विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने कार्यकारिणीची बैठक घेतली. मात्र, नेमक्या त्याचदिवशी कंत्राटदार पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मंगळवारीच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी (ता. १३) निदर्शने, पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात राष्ट्रीय व राज्य पातळीचे नेते उपस्थित राहिल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव जिल्हा राजकीय घडामोडींचे केंद्र ठरला आहे. एकंदरीत राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि भाजपने हळूहळू वर्चस्व मिळविलेल्या बेळगाव जिल्ह्यावर काँग्रेस पुन्हा पकड मिळविण्याची तयारी करत आहे.
‘आप’ वाढवतोय ताकद
राज्यात सत्ता स्थापण्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटक महत्वाचे आहे. यामुळे धजद पक्षाने यापूर्वी तितकेच प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. परंतु, आता आम आदमी पक्षाने ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने आपकडून नियमित आंदोलने, दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत.
Web Title: Belgaum Congress Break Through Bjp Tronghold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..