
बेळगाव : विमानसेवेच्या माध्यमातून बेळगाव देशातील १५ शहरांशी जोडले जाणार
बेळगाव : विमानसेवेच्या माध्यमातून बेळगाव शहर देशातील १५ शहरांशी जोडले जाणार आहे. सध्या बेळगावहून देशातील १० शहरांना थेट विमानातून जाणे शक्य आहे. बेळगाव- दिल्ली व बेळगाव-नागपूर या दोन विमानसेवा लवकरच सुरू होणार आहेत. बेळगाव-दिल्ली विमानसेवा २७ मार्चपासून सुरू होणार आहे. बेळगाव- नागपूर विमानसेवा १६ एप्रिलपासून सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
तीन शहरांना एका थांब्यासह विमानसेवा सुरू आहे. दिल्ली व नागपूर मार्गावर विमान सुरू झाले की बेळगाव शहर देशातील १२ शहरांशी थेट जोडले जाणार आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी उडाण योजनेत बेळगावचे नाव आले. उडान योजनेतून बेळगावसाठी विमानसेवांची घोषणा करण्यात आली. उडाणमधून बेळगावसाठी १३ मार्गांवर विमानसेवांची घोषणा झाली. उडाणमधील १३ पैकी १२ मार्गांवरील विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. उडाणमधील बेळगाव-जयपूर ही स्टार एअरची विमानसेवा सुरू होणे बाकी आहे. सध्या बेळगावहून बंगळूर, दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, अहमदाबाद, सूरत, पुणे, जोधपूर, नाशिक, इंदोर, तिरूपती या मार्गांवर थेट विमानसेवा आहे. नागपूरची विमानसेवा १६ एप्रिलला सुरू होईल. त्यामुळे थेट १२ शहरांशी बेळगाव जोडले जाईल. बेळगाव-गुलबर्गी ही विमानसेवा सुरू आहे, पण ते विमान तिरूपती मार्गे गुलबर्गी येथे जाते. बेळगाव-किशनगढ विमान सूरतमार्गे जाते.
बेळगाव नाशिक विमान पुणे मार्गेही जाते. बेळगावातून ट्र्यूजेट कंपनीची विमानसेवा सुरू होती, पण काही कारणास्तव या कंपनीची विमानसेवा सध्या बंद आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी २०१९ च्या आधी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यात बेळगावातील उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधींचाही सहभाग होता. या पाठपुराव्यामुळेच बेळगावचा समावेश उडाण योजनेत झाला व तब्बल १३ मार्गांवर विमानसेवांची घोषणा झाली. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्याकडूनही सातत्याने पाठपुरावा झाला.
बेळगावात जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेले अतुलकुमार तिवारी हे आयएएस अधिकारी नागरी विमान वाहतूक खात्यात उच्चपदस्थ आहेत. त्यांनीही बेळगावला विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले. बेळगावच्या या विमानसेवांचा महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांनाही मोठा फायदा झाला आहे. विविध विमान कंपन्यांनी बेळगावातून विमानसेवा सुरू करण्यास पुढाकार घेतला. त्यांचा हा निर्णय फायदेशीर ठरला. सर्वच विमानसेवांना प्रवाशांकडून उत्तर प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे विमान कंपन्यांही आणखी सेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत.
Web Title: Belgaum Connected To 15 Cities Country Through Air Services
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..