आरोग्य विभागच धास्तावला : महापालिकेच्या सफाई ठेकेदाराचा कोरोनामुळे मृत्यू.....

मल्लिकार्जुन मुगळी
Tuesday, 4 August 2020

बेळगाव महापालिकेच्या सफाई ठेकेदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सफाई ठेकेदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंगळवारी पहाटे बिम्स येथे उपचार सुरू असताना ठेकेदाराचा मृत्यू झाला. महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार महिलेचा रविवारी कोरोनामुळेच मृत्यू झाला. दोन दिवसात ठेकेदारालाही आपले प्राण गमवावे लागले. यामुळे महापालिकेचा संपूर्ण आरोग्य विभागच धास्तावला आहे.

उपलब्ध माहितीनुसार सदर ठेकेदार गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर घरीच एका खासगी डॉक्टरकडून उपचार सुरू होते. पण तीन दिवसांपूर्वी त्या ठेकेदाराची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्याला तातडीने शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तेथे दाखल करून घेतले नाही. बिम्स मध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्या ठेकेदाराला बिम्स मध्ये दाखल करण्यात आले पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा- मुलगा आणि आई एकाच वर्षी झाले दहावीची परीक्षा उत्तीर्ण -

त्या ठेकेदाराचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह होता, गेले दोन दिवस बिम्स मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती महापालिका आरोग्यधिकारी डॉ बसवराज धबाडी यांनी सकाळला दिली
कोरोना काळात शहरातील ४७ प्रभागांची स्वच्छता ९  ठेकेदार करीत आहेत. कोरोनामुळे एखाद्या सफाई कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना १० ते १५ लाख रुपये भरपाई द्यावी लागेल. या भीतीने सर्व म्हणजे ९ ठेकेदारांनी शहर स्वच्छतेचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण महापालिका आयुक्त के एच जगदीश यानी विनंती केल्यामुळे त्यानी पुन्हा स्वच्छता काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा-भरधाव ट्रक घुसला...दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला... -

शहर स्वच्छता काम योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी शहरात फेरफटका मारावा लागतो. सफाई कामगार, पर्यवेक्षक यांची भेट घ्यावी लागते. त्यातून या ठेकेदाराचा कोरोना बाधिताशी संपर्क आला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. तरुण वयाच्या या ठेकेदारांने हॉस्पिटलमध्ये दाखल न होता घरीच उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला. शहापूर येथील एका डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते, पण ठेकेदाराचा तो निर्णय चुकीचा ठरला. वेळीच बिम्स किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज होती . या घटनेमुळे महापालिका प्रशासन हादरले आहे. गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोनाबधितांवर उपचार करण्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum Corona death of municipal cleaning contractors